मुख्य बातमी

आयटीआय संगमेश्वरच्या विद्यार्थ्याची स्पेनमध्ये आंतरराष्ट्रीय पॅसेंजरशिप कंपनीत निवड; प्रतिमहा एक लाखापेक्षा जास्त वेतन

रत्नागिरी : जिद्द, मेहनत आणि कौशल्याच्या बळावर ग्रामीण भागातील तरुणांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर गरुडझेप घेण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणले आहे. तालुक्यातील काटवली या छोट्याशा गावातील सुपुत्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) संगमेश्वरचा माजी विद्यार्थी सुजित जाधव याची स्पेनमधील एका नामवंत आंतरराष्ट्रीय पॅसेंजर शिप कंपनीत ‘असिस्टंट प्लंबर’ पदावर निवड झाली आहे. त्याच्या या अभूतपूर्व यशामुळे आयटीआय संस्थेसह संपूर्ण संगमेश्वर तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे.

या जागतिक दर्जाच्या पदासाठी सुजितला प्रतिमहा सुमारे एक लाखापेक्षा जास्त वेतन मिळणार आहे. एका छोट्याशा गावातून थेट आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपनीपर्यंत प्रवास करणाऱ्या सुजितच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

एआय’ तांत्रिक कौशल्याची जागा घेऊ शकत नाही. आपल्या या यशाबद्दल आणि आजच्या तरुण पिढीला संदेश देताना सुजित सांगतो की, “आजच्या आधुनिक युगात तरुणांनी केवळ पदव्यांमागे न धावता प्रत्यक्ष कौशल्यांवर (Skills) अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. भविष्यात फिटिंग, वेल्डिंग, प्लंबिंग, सुतारकाम, इलेक्ट्रिकल आणि यांत्रिक काम यांसारख्या तांत्रिक व व्यावहारिक कौशल्यांना जगभरात प्रचंड मागणी असणार आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता कितीही प्रगत झाली, तरी ती मानवी हातांच्या तांत्रिक कौशल्याची जागा घेऊ शकत नाही.”

त्याने पुढे आवाहन केले की, आजच्या प्रगत युगात टिकून राहण्यासाठी आणि स्वतःची प्रगती साधण्यासाठी तरुणांनी व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या ‘आय.टी.आय.’ सारख्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे. तेथून योग्य कौशल्य आत्मसात करून आपण जागतिक स्तरावर प्राविण्य मिळवू शकतो, हा विश्वास त्याने व्यक्त केला.

सुजित याच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याधारित शिक्षणाविषयी एक नवा उत्साह निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!