मुख्य बातमी

सुहास भोळेंची सातवी कादंबरी ‘आद्यविदुषी’ लवकरच वाचकांच्या भेटीला

रत्नागिरी : रत्नागिरीच्या नाट्यक्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेला गुणी कलाकार, लेखक सुहास भोळे यांनी नुकतीच आपली मराठी भाषेतील तिसरी आणि एकूण सातवी कादंबरी “आद्यविदुषी” लिहून पूर्ण केली आहे. यापूर्वी लिहिलेल्या ‘मंथन’ आणि ‘क्षमोपणि’ या दोन्ही कादंबऱ्या त्यांनी हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये सुद्धा लिहिल्या आहेत.

श्री. भोळे यांनी आजपर्यंत ३९ नाटके, २१ एकांकिका, सहा लघुपट, ललित लेख तसेच अनेक कथा लिहिल्या आहेत. ते अनेक कलाक्षेत्रात आपली वैविध्यपूर्ण कला सादर करत असून, या कादंबरीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलखुलास चर्चा केली.

* आपल्या सर्वच कलाकृतींची नावे खूपच वेगळी असतात, त्यामागे काही खास वैशिष्ट्य?

मुळात एखादी चारोळी लिहिताना सुद्धा वैचारिक मंथन करावेच लागते. एखाद्या कादंबरी लेखनामागे तर अनेक वर्षांचा अभ्यास असतो. जर लेखनासाठी इतका विचार करायचा तर त्याचे ‘शीर्षक’ आकर्षक आणि योग्य का नसावे? शीर्षकावरून काय आहे हे समजण्यापेक्षा वाचून झाल्यावर शीर्षक उत्तम आहे अशी प्रतिक्रिया मला जास्त अपेक्षित असते.

* आपण इतके लिखाण करता त्यासाठी वाचक लाभतात?

आपण बातम्या ज्यासाठी लिहिता, त्यासाठीच मी सुद्धा लिहितो. हे खरे आहे की पूर्वीच्या तुलनेत मराठी वाचक कमी झाले आहेत. त्याची कारणे सुद्धा अनेक आहेत. म्हणून मी अलीकडे माझे कोणतेही लिखाण हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये रूपांतरित करतो. प्रत्यक्ष पुस्तक वाचणारे कमी झाले असले तरी आज अनेक प्रकारच्या माध्यमातून तरुणाई वाचत असते. तुम्हाला माहित आहेच की मी यंत्र अभियंता असल्यामुळे नवनवीन तंत्रज्ञान शिकून घेण्याकडे माझा कल असतो. आपण केलेले लिखाण इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी असलेल्या सर्व माध्यमांचा मी वापर करत असतो. आत्ताच काही ठोस सांगत नाही, कदाचित या कादंबरीला वेगळ्या रूपात आपल्या समोर घेऊन येईन. ‌

* या कादंबरीचा विषय कोणता आहे?

कादंबरीच्या नावावरून थोडेफार लक्षात येत असेलच! आद्य म्हणजे प्रथम, विदुषी म्हणजे सुशिक्षित सुसंस्कारित स्त्री.

* अशी कोण होती? रसिकांना थोडीफार कल्पना येईल असे सांगा.

हा प्रश्न विविध माध्यमांवर विचारला तर विविधांगी उत्तरे सापडतील. ती कोण? हेच मी कादंबरी मधून स्पष्ट केले आहे. ही कादंबरी पौराणिक विषयावर आधारीत आहे. पूर्वीपासून आजपर्यंत पुरुषप्रधान समाज आपल्याला दिसून येतो. पुरुषांनी स्त्रीयांवर केलेले अन्याय जास्तीत जास्त लवपून ठेवण्याचा प्रयत्न आजही केला जातो. यातील नायिका महाभारतातील एक स्त्री असली तरी महाभारतात तिचा अगदी नगण्य उल्लेख आढळून येतो. याच विषयावर आधारीत मी २००४/२००५ मध्ये एक नाटक लिहून घवघवीत यश संपादन केले होते. या नाटकाच्या तेव्हा बालगंधर्व नाट्यमंदिर (पुणे) येथे झालेल्या अंतिम फेरीतील प्रयोगात ३७ स्त्री कलावंत आणि १९ पुरुष कलावंत सहभागी झाले होते. माझ्या दोन्ही कन्या जिज्ञासा आणि अक्षता यात प्रमुख भूमिकेत होत्या. जिज्ञासा हिला पुण्यातील अ. भा. नाट्य परिषदेच्या सभासदांनी परिषदेचा ‘कलामंदीर’ हा पुरस्कार जाहीर केला होता, जो तिला अमोल पालेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.

या थोर स्त्री बद्दल अनेक लेखकांनी वैविध्यपूर्ण लेखन केले असले तरी ते केवळ तिच्या तरुणपणीचे आहेत. सुहास भोळे यांनी तिचे बालपण आणि पुढील आयुष्य यात प्रथमच विस्ताराने लिहिले आहे. लवकरच ही आद्यविदुषी वाचकांच्या हाती लागेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!