मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आबलोलीतील चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

आबलोली (संदेश कदम) : लोकशिक्षण मंडळ आबलोली संचलित चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये गुरुबद्दल आदर कृतज्ञता आणि संस्काराची भावना वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक डी. डी. गिरी यांनी भूषविले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या सौ. श्वेता कदम यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता आठवीच्या आराध्या अमोल पवार व पूजा तृशांत सुर्वे विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी गुरुप्रती आदर व कृतज्ञ भावना व्यक्त करणारी गीते सादर केली. यावेळी कला शिक्षक स्वरूप केळसकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच इयत्ता ८ वी मधील स्वरा गुरुप्रसाद आचार्य व इयत्ता ७ वी मधील वैभवी साळवी हिने गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद करणारी मनोगते व्यक्त करून उपस्थित सर्वांची मने जिंकली.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यालयाचे माजी विद्यार्थी सन २०१६ च्या बॅचचे विद्यार्थी आणि आताचे डॉ. मृणाल सुहास गायकवाड (एमबीबीएस) यांचा यावेळी शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला. त्यानंतर डॉ. मृणाल गायकवाड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या शैक्षणिक प्रवासातील अनुभव सांगितले. यश संपादन संपादनासाठी कठोर परिश्रम सातत्य शिस्त आणि शिक्षकांचे मार्गदर्शन किती महत्त्वाचे आहे, या विषयावर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी नितीन जगताप यांनीही विद्यार्थ्यांना जीवनात ध्येय निश्चित करून प्रामाणिक प्रयत्न करण्याचे महत्त्व पटवून देत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक श्री. गिरी यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद करताना गुरु हा विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारा दीपस्तंभ असून ज्ञानाबरोबरच संस्कारांची जोपासना करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयातील सर्व शिक्षकांच्या सहकार्याने करण्यात आले. शेवटी वैभव ढवळ यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!