आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमी

विषमुक्त शेतीसाठी ‘गोकृपा अमृत’ ठरणार वरदान; सोमवारी रत्नागिरीतील शेतकऱ्यांसाठी विशेष ऑनलाईन वेबिनार

रत्नागिरी : हवामान बदलाचे संकट आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा घसरणारा दर्जा सुधारण्यासाठी ‘गोकृपा अमृत सूक्ष्मजीव कल्चर’ हा नैसर्गिक शेतीतील एक अत्यंत प्रभावी पर्याय समोर आला आहे. या विषमुक्त शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सोमवारी (२७ जुलै) सायंकाळी ६ ते ८ या वेळेत एका विशेष ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक गावात कृषी विभागाच्या माध्यमातून हे ‘गोकृपा अमृत कल्चर’ मोफत उपलब्ध करून देण्यात आले असून, त्याचा वापर करून शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.

काय आहे ‘गोकृपा अमृत’?

गोकृपा अमृतमध्ये वनस्पती आणि जमिनीसाठी अत्यंत पोषक असे १३८ हून अधिक लाभदायक सूक्ष्मजीव (Microbes) असतात. रासायनिक खतांमुळे मृतप्राय झालेल्या जमिनीत या मित्र जिवाणूंची संख्या वाढवून मातीला सजीव, सुपीक व भुसभुशीत करण्याचे काम हे कल्चर करते. यामुळे जमिनीतील सुप्त पोषकतत्वे पिकांना सहज उपलब्ध होतात आणि रासायनिक खते व कीटकनाशकांवरील अवलंबित्व कमी होऊन शेती अल्पखर्चिक आणि शाश्वत बनते.

घरच्या घरी बनवण्याची सोपी पद्धत:

गोकृपा अमृतचे द्रावण शेतकरी अत्यंत सोप्या पद्धतीने तयार करू शकतात. एका २०० लिटरच्या (फक्त प्लास्टिकच्या) बॅरलमध्ये १९६ लिटर पाणी घ्यावे. त्यात २ किलो सेंद्रिय गूळ, २ लिटर देशी गाईचे ताक आणि १ लिटर मूळ गोकृपा अमृतचे कल्चर (मदर कल्चर) एकत्र मिसळावे. हे मिश्रण सलग ७ दिवस घड्याळाच्या काट्याच्या दिशेने (Clockwise) रोज सकाळी ५ मिनिटे काठीने ढवळावे आणि सावलीत सुती कापडाने झाकून ठेवावे. सात दिवसांनंतर हे समृद्ध गोकृपा अमृत वापरासाठी तयार होते. हे ठिबक सिंचनाद्वारे थेट पिकांच्या मुळाशी सोडता येते. पाटाच्या पाण्यासोबत शेतात पसरवता येते किंवा पिकांवर थेट फवारणी करता येते. पालापाचोळा कुजवण्यासाठी, शेणाच्या स्लरीमध्ये जिवाणूंची संख्या वाढवण्यासाठी आणि कंपोस्ट खताच्या पोषण वृद्धीसाठी याचा उत्तम उपयोग होतो.

यामुळे मातीची सुपीकता वाढून पोत सुधारतो, पिकांचे उत्पादन आणि गुणवत्तेत वाढ होते, रासायनिक खतांवरील खर्च कमी होतो, पिकांची नैसर्गिक रोग व कीड प्रतिकारशक्ती वाढते, पर्यायाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते.

बन्सी गीर गोशाळा (अहमदाबाद) आणि विभागीय कृषी सहसंचालक (कोकण विभाग, ठाणे) यांच्या संयुक्त विद्यमाने २७ जुलै रोजी वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बन्सी गीर गोशाळेचे संस्थापक गोपालभाई सुतारिया उपस्थित राहून गोकृपा अमृतचे तंत्रज्ञान, ते बनवण्याची पद्धत आणि नैसर्गिक शेतीचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी, शेतकरी गट, महिला शेतकरी तसेच विषमुक्त व नैसर्गिक शेतीकडे वळू इच्छिणाऱ्या तरुणांनी या ऑनलाईन वेबिनारमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. या वेबिनारची जॉईन लिंक व क्यूआर कोड (QR Code) मिळवण्यासाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सदाफुले यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!