१४ मार्च रोजी लोकअदालत

रत्नागिरी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे १४ मार्च रोजी रत्नागिरी येथील जिल्हा न्यायालय, जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालय येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या लोक अदालतचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपले वाद सामोपचाराने मिटवावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश विनोद यशवंतराव जाधव यांनी केले आहे.
लोकअदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी खटले, कौटुंबिक वाद, चेक बाऊस, दिवाणी वाद, वाद दाखलपूर्व प्रकरणाअंतर्गत विद्युत कंपनी, बँका, पतसंस्था यांचे थकीत कर्जाबाबतची दाखल पूर्व प्रकरणे, तसेच नगरपालिका, ग्रामपंचायत थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीची प्रकरणे ठेवण्यात आली आहेत.
पक्षकारांनी त्यांची प्रकरणे लोक अदालतमध्ये ठेवण्याकरीता आपले वकील, संबंधित न्यायालय अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव आर. आर. पाटील यांनी केले आहे.



