मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा

जवाहर चौक पाण्याखाली, अणुस्कुरा घाटात दरड कोसळली : दरड हटवण्याचे काम युध्द पातळीवर

राजापूर : गेले आठवडाभर संततधारेने कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी रात्रीपासूनच जोर धरल्याने मंगळवारी पहाटे राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. पुराचे पाणी जवाहर चौकातील राधाकृष्ण कोल्ड्रिंक्सपर्यंत पोहोचले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. शीळकडे जाणारा मार्ग पाण्याखाली गेला असून शहरातील बहुतांशी भाग पुराच्या पाण्याखाली गेला आहे . तर व्यापाऱ्यांनी आपला माल सुरक्षित स्थळी हलवला आहे.

सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन कोदवली नदीचे पाणी शहर बाजारपेठेत शिरले आहे. शहरातील भटाळी, गुजराळी, वरचीपेठ, चिंचबांध, आंबेवाडी आदी भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मंगळवारी पहाटे पुराच्या पाण्याचा जोर जास्तच वाढल्याने राजापूर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील माल सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. शहरातील शिवाजी पथ रस्ता पूर्णतः पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील व्यापाऱ्यांनी व रहिवाशांनी आपले सामान सुरक्षित स्थळी हलवले आहे.

सकाळी ६ वाजता शहरातील जवाहर चौकात पुराचे पाणी भरल्याने शहरातील संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. हवामान खात्याने मंगळवारी कोकणातील जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केल्याने जिल्हा प्रशासनाने सोमवारी रात्रीच जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयाना सुट्टी जाहीर केली आहे. आजच्या पावसाने तालुक्यातील अनेक भागात पुराचे पाणी शिरल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मंगळवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास अनुस्कुरा घाटात दरड कोसळली असून घाटमाथ्यावर जाणारी वाहतूक बंद झाली आहे. प्रशासनाने या ठिकाणी तात्काळ यंत्रणा पाठवून दरड बाजूला करण्याचे काम हाती घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!