मुख्य बातमी

सीए रत्नागिरी शाखेतर्फे चर्चासत्राला प्रतिसाद

रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे हॉटेल सिल्वर स्वॅन येथे चर्चासत्र घेण्यात आले. या वेळी व्यावसायिक नीतिमत्ता, वस्तू व सेवा कर कायद्यातील बदल आणि आर्थिक पत्रके तयार करण्यासाठी नवीन नमुना या विषयावर वक्त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक करताना रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए मंदार जोशी यांनी वरील विषयांचे महत्त्व सांगितले. त्यानंतर सीए प्रसाद आचरेकर यांनी व्यावसायिक नीतिमत्ता म्हणजे काय हे सांगून काही महत्त्वाच्या तरतुदींवर प्रकाश टाकला. आपल्या सत्राचा शेवट त्यांनी नजीकच्या काळात सीएच्या विरोधात घडलेले काही दावे आणि त्यावर सीए इन्स्टिट्यूटच्या कमिटीने दिलेले निकाल यांचे संदर्भ देऊन केला.

सीए वैभव देवधर यांनी वस्तू व सेवाकर, विवरणपत्रात झालेले बदल सांगत त्यातील फायदे तोटे समजावून सांगितले. विवरण पत्राचा नवीन नमुना दाखल करताना काय काळजी घेतली जावी यावर देखील त्यांनी मार्गदर्शन केले. ठाणे येथील सीए आदित्य कानेटकर यांनी कंपनी, ट्रस्ट, सोसायटी इत्यादी वगळता इतर सर्व व्यावसायिक आस्थापनांसाठी आर्थिक पत्रके तयार करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या नवीन नमुन्याबद्दल मार्गदर्शन केले. दोन भिन्न वर्षे तसेच दोन भिन्न आस्थापना यांच्या आर्थिक पत्रकात तुलना करता यावी तसेच भारतातील सर्व व्यावसायिक आस्थापनांच्या आर्थिक पत्रकात सुसंगतता असावी, यासाठी या नवीन नमुन्याचा कसा फायदा होऊ शकतो, हे सांगितले.

सूत्रसंचालन सीए कपिल लिमये यांनी केले. शाखेचे सचिव सीए अक्षय जोशी यांनी आभार मानले. या वेळी कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!