Uncategorized

राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि शिवरायांच्या तेजस्वी विचारातून नवराष्ट्र घडेल : परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे

मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे अभूतपूर्व उत्साहात महिला मेळावा साजरा

नाशिक : हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि त्यांचे शूरवीर युगप्रवर्तक पुत्र हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेजस्वी आणि जाज्वल्य विचार प्रत्येकाने आत्मसात केले तर महिलांवरील अन्याय, अत्याचार शिल्लक राहणार नाहीच आणि त्याचबरोबर एका नव्या सुवर्ण युगाला देखील प्रारंभ होईल असे विचार सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांनी मांडले तेव्हा उपस्थित लाखो सेवेकर्‍यांनी टाळ्यांचा जोरदार कडकडाट करून सारा आसमंत जयजयकाराच्या घोषणांनी दुमदुमून टाकला.

श्री स्वामी सेवामार्गातर्फे बुलडाणा जिल्ह्यातील राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जन्मभूमी असलेल्या सिंदखेड राजा येथे जागर स्त्रीशक्तीचा गजर राष्ट्रभक्तीचा महिला सक्षमीकरण मेळावा अभूतपूर्व प्रतिसादात मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक विविध उपक्रम साजरे झाले. सायंकाळी अत्यंत चैतन्यदायी वातावरणात लाखो सेवेकऱ्यांना परमपूज्य गुरुमाऊलींनी संबोधित केले.

ते म्हणाले की, बऱ्याच वर्षांपासून राजमाता जिजाऊ यांच्या जन्मभूमीत मेळावा घेण्याची इच्छा होती. ही इच्छा आज पूर्ण होताना अत्यंत आनंद होतोय. ही शूरवीरांची भूमी आहे. राजे लखुजीराव जाधव यांची कर्मभूमी, राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांची जन्मभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ असल्यामुळे शौर्य, पराक्रम आणि वीररसाची या भूमीला कमतरता नाही. जी शिकवण जिजाऊ माँ साहेबांनी छत्रपती शिवरायांना दिली त्यातूनच हिंदवी स्वराज्य स्वराज्य निर्माण झाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला श्री दत्तप्रभूचे अवतार नृसिंह सरस्वती महाराज यांनी साक्षात उपस्थित राहून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांना भरभरून आशीर्वाद दिले. साक्षात दत्तप्रभूंचेच आशीर्वाद लाभल्यामुळे अनेक संकटे आली मात्र त्यातून बुद्धी कौशल्य आणि पराक्रम गाजवून शिवरायांनी मुघल साम्राज्याला दाती तृण धरायला लावले. राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि छत्रपतींचा हा जीवनादर्श आणि हा तेजस्वी इतिहास उच्च शिक्षणामध्ये समाविष्ट झाला पाहिजे अशी अपेक्षा गुरुमाऊलींनी बोलून दाखवली. आपल्या अमृततुल्य हितगुजामध्ये मूल्यशिक्षण, आयुर्वेदिक औषधे, वास्तुशास्त्र, कृषी, पर्यावरण, कायदेविषयक माहिती आणि सेवामार्गाच्या उपक्रमाविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

मान्यवरांकडून गुरुमाऊलींच्या कार्याचा गौरव

केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, स्थानिक आमदार मनोज कायंदे, शिवशाहीर शिवराज शेटे, जिजाऊ माँ साहेबांचे वंशज तंजावरचे रचितराजे भोसले या मान्यवरांनीही परमपूज्य गुरुमाऊलींच्या सेवाभावी मानवतावादी कार्याचा गौरव केला. केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे याही शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित होत्या. जिजाऊ माँ साहेब, शिव प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला.

तेजस्वी पिढी घडवायची आहे : आबासाहेब मोरे

या संपूर्ण भव्य दिव्य कार्यक्रमाचे नीटनेटके नियोजन करणारे गुरुपुत्र श्री आबासाहेब मोरे यांनी खणखणीत शब्दात संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेताना जिजाऊ माँ साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखी तेजस्वी पिढी निर्माण करण्यासाठी सर्वांनी योगदान द्या असे आवाहन केले.

५१ गडांवरील माती अर्पण, ५१ कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आणि दहा जोडप्यांचा विवाह

शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील विविध ५१ गडांवरील माती आणून ती मातृतीर्थात अर्पण करण्याचा अनोखा, उत्कट उपक्रम उत्साहात पार पडला. त्याचप्रमाणे समाजातील विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवून नावलौकिक निर्माण करणाऱ्या ५१ यशस्वी महिलांचा परमपूज्य गुरुमाऊली यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. तेव्हा संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने १० जोडप्यांचा सामुदायिक विवाह लाखो सेवेकरांच्या उपस्थितीत पार पडला.

वधू-वर परिचय, स्वयंरोजगार मेळावा आणि मराठी अस्मिता प्रदर्शन

सेवामार्गातर्फे कार्यक्रम स्थळी वधू- वर परिचय मेळावा आणि विवाह नोंदणी मोठ्या प्रतिसादात पार पडली. त्याचप्रमाणे स्वयंरोजगार मेळाव्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. भव्य मंडपात मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृतीचे भव्य दिव्य प्रदर्शन भरवण्यात आले होते. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. बचत गट आणि महिलांनी व्यवसाय कसे करावेत त्याबाबत उद्योजक प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेण्यात आले या उपक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळाला.

विश्वशांती आणि राष्ट्र संरक्षणासाठी आदिशक्ती भगवतीची सर्वोच्च सेवा श्री दुर्गा सप्तशती पाठाचे सामुदायिक वाचन घेण्यात आले. उपस्थित सर्व सेवेकर्‍यांनी या साऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन अत्यंत नियोजनपूर्वक आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. परमपूज्य गुरुमाऊलींच्या आगमनामुळे वरुण राजानेही काही काळ हजेरी लावली होती. त्यामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला होता.

विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

व्यासपीठावर परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे, गुरुमाता सौ. मंदाकिनी मोरे, यांच्यासमवेत केंद्रीय आयुष्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, आमदार मनोज कायंदे, गुरुपुत्र आबासाहेब मोरे, साध्वी दुर्गा दीदी, करवंद राज घराण्याचे हरिश्चंद्र इंगळे, सौ. सीमा अर्जुन खोतकर यांच्यासह माजी आमदार तोताराम कायंदे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर, जयश्री शेळके, ॲड. नाझेर काझी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा नंदा कायंदे, डॉ. सुनील कायंदे, विष्णूभाऊ मेहेत्रे, माजी नगराध्यक्ष देवीदास ठाकरे, छगनराव मेहेत्रे, माजी नगराध्यक्ष सतीश तायडे, माजी नगराध्यक्षा सौ. नंदाताई मेहत्रे, मृत्युंजय गायकवाड, सतीश कायंदे, भाग्यश्री खेडेकर, किरण तायडे, नितीन कायंदे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार अजित चिवटे, ठाणेदार ब्रह्मदेव शेळके, मुख्याधिकारी आशिष बोबडे, गटविकास अधिकारी अंकुश मस्के आदी मान्यवर उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. स्थानिक प्रशासनानेही कार्यक्रमासाठी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. मुकुंदराव कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!