महाराष्ट्रमुख्य बातमी

केरळात मान्सून दाखल; राज्यात १ जूनला आगमनाची शक्यता

मुंबई : मे महिन्यातच राज्याला मान्सूनपूर्व म्हणजेच अवकाळी पावसाचा तडाखा बसला असतानाच, आता पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे, मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले आहे. केरळमध्ये आठ दिवस आधीच मान्सून डेरेदाखल झाला असून गेल्या १६ वर्षांत नियोजित वेळेपेक्षा लवकर एंट्री होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. आता मान्सूनच्या आगमनानंतर पुढील प्रवासासाठी प्रतिकूल वातावरण असल्यामुळे मुंबईत १ जूनपर्यंत पावसाचे आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

केरळ हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार मानले जाते. केरळात प्रवेश केल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून देशभरात आगेकूच करतो. नैऋत्य मान्सून साधारणपणे १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो आणि आगेकूच करत ८ जुलै रोजी संपूर्ण देश व्यापतो, तर १७ सप्टेंबरच्या सुमारास तो वायव्य हिंदुस्थानातून माघारीचा प्रवास सुरू करतो आणि १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे माघार घेतो, पण दरवर्षी १ जून या तारखेला केरळमध्ये दाखल होणारा पाऊस यंदा आठवडाभर आधीच दाखल झाला आहे. याआधी २००९ आणि २००१ मध्ये मान्सून २३ मे रोजीच दाखल झाला होता. गेल्या वर्षी २०२४मध्ये मान्सून ३० मे रोजी केरळमध्ये धडकला होता. १९१८ मध्ये सर्वात लवकर म्हणजेच ११ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. आता यंदा मान्सून लवकर दाखल झाल्याने सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गुजरात, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळच्या किनारी भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील सात दिवस या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!