“जीजेसी ९५ गोल्डन फॅमिली”चे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात १९९५ मध्ये शिकलेल्या सर्व शाखातील विद्यार्थी गेले अनेक वर्ष एकत्र येऊन स्नेहसंमेलन करत आहेत. यावर्षीही १०० पेक्षा अधिक माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहामध्ये संपन्न झाले. माजी विद्यार्थी संघटन करून समाजातील अनेक ठिकाणच्या कार्यामध्ये सक्रिय असलेले कॉलेज मित्र म्हणून एकत्र येतात आणि त्यातून अनेक सहकार्यातून मित्रांच्या विकासासाठी, मानसिक पाठिंबा मिळवण्यासाठी काम केले जाते.
गेली अनेक वर्ष ९५ म्हणजे ऊर्जा, ९५ म्हणजे मैत्रीचा विश्वास, ९५ म्हणजे सहकार्याची हमी, ९५ म्हणजे जगण्याचे औषध, ९५ म्हणजे एक आपुलकीचे नाते झाले आहे. केवळ वर्षातून एकत्र येणे मजा मस्ती करणे असा उद्देश ठेवत आपुलकीचा पाठिंबा देणारे संघटन झाले आहे. सातत्याने एकत्र यावे म्हणून दर महिन्याला त्या महिन्यातील मित्र सामूहिक बर्थ सेलिब्रेशन करतात आणि आपल्या आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलतात, व्यक्त होतात.

वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. शाकाहारी आणि मांसाहारी दोन विभागांमध्ये पाककला स्पर्धा संपन्न झाली. तसेच स्त्रियांसाठी पैठणीचा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि खिलाडी वृत्तीने संपन्न झाला. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गाण्यांचा कार्यक्रम तसेच नृत्याचे कार्यक्रम आणि विविध फॅशन शो सादर करण्यात आले. या संमेलनाला मुंबई, पुणे, गोवा, पनवेल, पेण इथून सुद्धा अनेक माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.
व्यवस्थापनाच्या जबाबदारीमध्ये बिपीन बंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेखर कवितके, संदेश गांगण, डॉ. आनंद आंबेकर, सत्यशील सावंत, समीर सावंत, सोनाली बंदरकर, अजित साळवी, योगिनी सावंत, सोनाली सावंत, ज्योती मुळे, मंजिरी लिमये, अस्मिता मालगुंडकर, देवयानी शेट्ये, हेमंत चोप्रा, संकेत घाग, अमरेश सावंत, राजेश जाधव, महेंद्र बोरकर यांनी विशेष सहकार्य केले. सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सोनाली सावंत आणि कौस्तुभ सावंत यांनी केले.



