मुख्य बातमी

‘सांजसोबत’च्या संजय सुर्वे यांच्या आकाशवाणीवरील मुलाखतीचे १७ जून रोजी प्रसारण

रत्नागिरी : गेली नऊ वर्ष निराधारांसाठी काम करणाऱ्या सांज सोबत या संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांची आकाशवाणीच्या इंद्रधनुष्य कार्यक्रमात संवाद साधण्यात आला असून, हा कार्यक्रम १७ जून रोजी सकाळी ९.३० वाजता प्रसारित होणार आहे.

चिपळूण तालुक्यातल्या अतिशय दुर्गम भागात एकाकी राहणाऱ्या निराधार वृद्धांची काळजी घेणारी सांज सोबत ही संस्था आज त्यांचा हक्काचा आधार बनली आहे. आयुष्याच्या सांजवेळी एकाकी जीवन जगणाऱ्या या सर्व वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे सांज सोबतचे कार्यकर्ते दरमहा न चुकता त्यांच्या घरी जातात. वर्षभराचे सण त्यांच्यासोबत साजरे करतात. त्यांच्या आजारपणात त्यांची काळजी घेतात. चिपळूणच्या महापुरातही सांज सोबतने अनेकांना मदतीचा हात दिला. अत्यंत नि:स्वार्थ भावनेने काम करणाऱ्या या सांज सोबतचे प्रतिनिधी संजय सुर्वे यांनी आपल्या मुलाखतीतून हा सगळा प्रवास उलगडला आहे.

स्वतः पत्रकार असणारे संजय सुर्वे गेली नऊ वर्ष सांज सोबतचे हे कार्य करत आहेत.आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात संजय सुर्वे यांच्याशी सोनाली सावंत यांनी हा संवाद साधला आहे. या कार्यक्रमाचे सादर करते विवेक वानखडे हे आहेत.

मध्यम लहरी 1143 किलो हर्ट्स, एफएम 101.5 मेगा हर्टझ, न्यूज ओन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲप वर या कार्यक्रमाचे थेट प्रसारण श्रोत्यांना ऐकता येईल. प्रसारण झाल्यानंतर हा कार्यक्रम airratnagiri या यूट्यूब चॅनलवरही श्रोत्यांना ऐकता येईल. निरपेक्ष बुद्धीने काम करणाऱ्या सांज सोबतची संजय सुर्वे यांनी उलगडलेली ही वाटचाल सर्व श्रोत्यांनी आवर्जून ऐकावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!