मुख्य बातमी

चिपळूण येथे २१ जून रोजी माजी सैनिकांसाठी जिल्हास्तरीय संपर्क अभियान, मेडिकल व डेंटल कॅम्पचे आयोजन

रत्नागिरी : जिल्हा तसेच शेजारील जिल्ह्यातील लगतच्या तालुक्यांमधून बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुप व इतर कोरमधून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता आणि त्यांच्या अवलंबितांच्या प्रलंबित समस्यांचे निवारण करण्यासाठी येत्या रविवारी (२१ जून) चिपळूण येथे एका भव्य ‘जिल्हास्तरीय संपर्क अभियाना’चे आयोजन करण्यात आले आहे.

हे अभियान २१ जून रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत पाटीदार भवन (चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे खडकी (पुणे) येथील रेकॉर्ड ऑफिस बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुपमधील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांच्या थेट उपस्थितीत पार पडणार आहे. यामुळे माजी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबियांना आपल्या प्रशासकीय अडचणी थेट संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडता येणार आहेत.

व अभियानात माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांच्या वैयक्तिक पेन्शन, नवीन पेन्शन योजना आणि कागदपत्रांशी संबंधित सर्व प्रलंबित अडचणींचे जागेवरच निवारण करण्यात येईल. तसेच कल्याणकारी योजनांची माहिती: माजी सैनिकांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती येथे दिली जाईल. अभियानादरम्यान सर्वांसाठी मेडिकल कॅम्प (वैद्यकीय तपासणी) आणि डेंटल कॅम्प (दंत चिकित्सा) अशी दुहेरी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उपस्थित राहणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी सकाळी चहा-नाश्ता तसेच दुपारच्या भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील व परिसरातील सर्व माजी सैनिक, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी आणि त्यांच्या संबंधित लाभार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. आपल्या पेन्शन किंवा इतर शासकीय कागदपत्रांच्या अडचणींचे जागेवरच निराकरण करून घेण्यासाठी २१ जून रोजी पाटीदार भवन, चिपळूण येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!