विचार जागे होण्यासाठी संमेलने होणे गरजेचे : डॉ. राजन गवस

रत्नागिरी : “लेखकाने लिहिते असायला हवे, तरच समाज विकसित, गतिमान, प्रवाही होणार आहे. साचलेपण आले की विचारांची गती खुंटते. त्यामुळे एकमेकांशी संवादित राहण्यासाठी, समृद्ध होण्यासाठी, माणसाचे किमान विचार जागे होण्यासाठी अशी संमेलने होणे गरजेचे आहेत,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाचे डॉ. राजन गवस यांनी केले.

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (मुंबई) आणि नवनिर्माण शिक्षण संस्था यांच्या वतीने २२ नोव्हेंबर रोजी आयोजित रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाचा अध्यक्षीय समारोप प्रसंगी ते बोलत होते केले. यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये उपस्थित होते.
“जाणिवा निर्माण झाल्या की त्यांची मशागत होते आणि त्यातून नवनिर्माण होते. त्यासाठी विचारांची घुसळण होणे आवश्यक आहे आणि त्याकरता विचारांची आंदोलने वाहती ठेवणे गरजेचे आहे. कितीही त्वेषाची रानं तयार केली, तरी त्यावर माणसाचे संगोपन होत नाही. ते प्रेमावर होते. लेखक प्रत्येकाला विचार करायला भाग पाडतो.”
आज दिवसभरात विविध परिसंवादाला विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती हे “नवनिर्माण”चे यश आहे, असे नमूद करतानाच संमेलनातून साहित्य निर्माण व्हावे आणि त्यातून साहित्य संमेलने व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली.
