जिल्ह्यातून १५ हजार ४१ विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी

रत्नागिरी : अकरावीसाठीची ऑनलाईन प्रवेश नोंदणी प्रक्रियेची मुदत गुरूवारी संपली असून अखेरच्या दिवसापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातून १५ हजार ४१ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. नोंदणी झालेल्यांपैकी १४ हजार ८७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी शुल्क जमा केले आहे. तर प्रवेश अर्ज भाग एक पूर्ण भरून प्रवेश लॉक केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४,८०९ तर प्रवेश अर्ज भाग दोन पूर्ण भरून प्रवेश लॉक केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४ हजार २९४ इतकी आहे.
अकरावी प्रवेशाच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेच्या ५ जूनपर्यंत दिलेल्या मुदतीत राज्यातून १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली आहे. यात कोल्हापूर विभागांतर्गंत रत्नागिरी जिल्ह्यासहृ, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्याचा समावेश होतो. आता सर्वसाधारण गुणवत्ता प्रवेश फेरी ८ जून रोजी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना नोंदणी करताना तांत्रिक अडचणी आल्या आहेत, त्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ९ ते ११ जून या कालावधीत हे प्रवेश पूर्ण करण्यात येणार असल्याचे राज्य शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शिक्षण विभागाच्या सॉफ्टवेअर प्रणालीतील तांत्रिक त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना नोंदणी करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. हजारो विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला. माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने ती समस्या दूर करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्यातून आलेल्या तक्रारी सोडवण्यात आल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.



