मुख्य बातमी

जिल्ह्यात १२ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

रत्नागिरी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी २८ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते १२ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिला आहे.

जिल्ह्याचे कार्यक्षेत्रामध्ये आगामी काळात सण, उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. तसेच विविध राजकीय पक्ष व संघटनातर्फे त्यांच्या निरनिराळ्या मागण्यांच्या तसेच विषयासंदर्भात कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ४ डिसेंबर रोजी दत्त जयंती, ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन तसेच ८ डिसेंबर रोजी संत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी करण्यात येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात खेड, चिपळूण, अलोरे-शिरगाव, रत्नागिरी, जयगड तसेच देवरुख या ठिकाणी, मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून अलोरे-शिरगांव पोलीस ठाणे हद्दीत साफयीस्ट कंपनी (खेड) येथील कोकोकोला कंपनी, जयगड येथील वाटद खंडाळा प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पाचे अनुषंगाने स्थानिकांकडून आपल्या विविध मागण्यासाठी केले जाणारे अचानक संप व आंदोलन तसेच रत्नागिरी जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना, वेगवेगळ्या घटकांतील नागरीकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी होणारे आंदोलन या अनुषंगाने  प्रतिबंधात्मक हे आदेश जारी केले आहेत.

नगरपालिका/नगरपंचायत निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून २ डिसेंबर रोजी मतदान व ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रचारादरम्यान राजकीय पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे, सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिका-टिपण्णी करणे यामुळे राजकीय तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होवू शकते. आगामी काळात जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता सामाजिक संघटना व राजकीय पक्ष पक्ष वाढीसाठी दौरे तसेच सभा घेत असून त्यामुळे त्यांचे कार्यकर्त्यांकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आला आहेत.

या कालावधीत शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेवून फिरणे. अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे, दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे. सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल, अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे. इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितीनी घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे. पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे.

अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच आदी बाबींना प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत.

प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणलाही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!