खरीप हंगाम सन २०२५-२६ मध्ये भात व नाचणी पेरणीबाबत शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी

रत्नागिरी : जिल्ह्यात २१ मेपासून सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पूर्वमोसमी पाऊस सुरू असून आतापर्यंत जिल्ह्यात ४६८.२ मिमी पाऊस झाला आहे. यापूर्वी मे महिन्यामध्ये इतका कधीही पाऊस पडलेला नाही. पेरणी साधारणपणे जूनच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यामध्ये होत असते. म्हणजेच पेरणीचा हंगाम आणखी गेलेला नाही. पाऊस सतत पडत असल्यामुळे पेरणी पुढे गेली तरी चालल्यासारखे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दोन दिवस पेरणी करू नये. यापुढे ४ ते ५ दिवस पाऊस थांबल्यानंतर ऊन पडल्यानंतर भात पेरणी करणे सोईस्कर होईल.
आजच्या परिस्थितीमध्ये भात पेरणी करायची असल्यास वरकस जमिनीवर नांगरणी करून गरव्या भात वाणांची उंच गादी वाफे तयार करून पेरणी करावी. पुढेही पाऊस असाच राहिला तर भात वियाणे १२ तास कोमट पाण्यामध्ये बुडवून ठेवावे. त्यानंतर पाण्यातुन काढून गोणपाटामध्ये २४ तास बांधून ठेवावे. गोणत्याच्या चारही बाजूंनी भाताचा सूका पेंढा अंघरावा. अशा पद्धतीने २४ तास झाल्यानंतर भात बियाण्याला कोंब आल्यावर हे बियाणे गादीवाफ्यावर पेरणी करावी. दोन ओळींमध्ये साधारणपणे १० ते १५ सेमी अंतर राखावे.” असा शेतपिक हवामान सल्ला डॉ. विजय दळवी, प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, शिरगाव, रत्नागिरी यांनी दिला आहे.
तसेच या पूर्व मोसमी पावसाने शेतकऱ्यांचे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास कृषी विभागाच्या अधिकारी/कर्मचारी यांचेशी संपर्क साधावा. जेणेकरून कृषी, महसूल व ग्रामविकास खाते यांच्याकडून होणारे संयुक्त पंचनामे होणे सोयीचे होईल. ॲग्रीस्टॅक योजनेमध्ये जिल्ह्यातील सर्व खातेदारांनी आपली शेतकरी नोंदणी करणे आवश्यक आहे. तथापि ज्यांची नोंदणी प्रलंबित आहे अशा सर्व खातेदारांनी ३१ मे २०२५ अखेर ॲग्रीस्टॅक योजनेमध्ये नोंदणी पूर्ण करून आपला फार्मर आयडी काढून घ्यावा. त्याशिवाय त्यांना पी एम किसान योजनेतील पुढील २० वा हप्ता वितरण होणार नसल्याचे शासनाचे निर्देश आहेत. नोंदणी करण्यासाठी mhfr.agristack.gov.in या पोर्टलवर शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करता येणार आहे. तसेच csc केंद्र आणि कृषी विभाग/महसूल विभाग/ग्रामविकास विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत ग्रामस्तरावर नोंदणीचे काम सुरू असल्याने त्यांच्याशी संपर्क करून नोंदणी करावी, असे आवाहन रत्नागिरीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.



