वाटद एमआयडीसीसंदर्भात इथून पुढे ग्रामस्थ आणि “मनसे”चा लढा एकत्रित असेल
मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली वाटद एमआयडीसी संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट

रत्नागिरी : तालुक्यातील वाटद येथे प्रस्तावित असलेल्या एमआयडीसीसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) जिल्हा कार्यकारणी व वाटद एमआयडीसी संघर्ष कृती समितीच्या प्रमुख पदाधिकारी यांची बैठक संघर्ष समिती प्रमुख प्रथमेश गवाणकर यांच्या निवास्थानी नुकतीच पार पडली.
मनसेचे पदाधिकाऱ्यांनी वाटद येथे वाटद एमआयडीसी संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी समितीची भूमिका समजून घेतली. शेतकऱ्यांचा व जनतेचा विरोध का आहे ? जमीन खरेदी-विक्री प्रक्रियेमध्ये नक्की कुणाचा हात आहे? शासन, प्रशासन कशा पद्धतीने ग्रामस्थांना वेठीस धरून प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करीत आहे. यापुढे आपल्या आंदोलनाची दिशा कशी असणार आहे, याबाबतीत समिती प्रमुख प्रथमेश गवाणकर यांनी सविस्तर माहिती दिली. आजपर्यंत मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे नेहमी सर्वसामान्य लोकांच्या, शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. कोकण निसर्गसंपन्न आहे आणि पर्यटनाच्या माध्यमातून येथील विकास झाला पाहिजे, अशी आग्रहाची मागणी राज ठाकरे यांची नेहमीच राहिली आहे. त्या अनुषंगाने ही चर्चा महत्त्वपूर्ण ठरते.

पुढील दोन दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अधिकृत भूमिका जाहीर केली जाईल व ती ग्रामस्थांच्या बाजूने असेल, असे मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले. इथून पुढील लढा एकत्रित असेल अशी ग्वाही देखील देण्यात आली.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, अरविंद मालाडकर, महेंद्र गुळेकर, सचिन शिंदे, रूपेश चव्हाण, किशोर कुळ्ये, सत्यविजय खाडे आणि जिल्हा कार्यकारणी सदस्य तसेच वाटद एमआयडीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष सहदेवजी वीर, उपाध्यक्ष संतोष बारगुडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.



