मुख्य बातमी

रत्नागिरीच्या राजा गणेशोत्सवाची जय्यत तयारी

विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

रत्नागिरी : श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक उत्सव मित्रमंडळ, मारुती मंदिर सर्कल, रत्नागिरी येथे यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे. गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार असून, संपूर्ण रत्नागिरीवासीयांसाठी हा उत्सव आनंद आणि भक्तीचा ठेवा ठरेल अशी मंडळाने माहिती दिली आहे. यावर्षी, दिनांक २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या काळात गणेशोत्सव साजरा होईल.

गणेशोत्सवाची सुरुवात २७ ऑगस्ट रोजी पहाटे ५.३० वाजता नित्यपूजेने होईल. त्यानंतर सकाळी १२.३० वाजता नैवेद्याची आरती आणि रात्री ८ वाजता महाआरती होईल. २७ ऑगस्टपासून ते ३ सप्टेंबरपर्यंत दररोज सकाळी आणि संध्याकाळी विविध भजन आणि भक्तिगीतांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ, श्री महापुरूष प्रासादिक भजन मंडळ, साई प्रासादिक भजन मंडळ यासारख्या अनेक सुप्रसिद्ध मंडळांचा सहभाग असणार आहे. तसेच, श्री स्वामी समर्थ स्वर तरंग, स्वरकल्लोळ, स्वर भैरवी यांसारख्या विविध संगीत संस्थांच्या माध्यमातून भक्तिगीतांची मेजवानी मिळणार आहे. या वर्षीच्या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे महिला आणि तरुणांसाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात ६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता चित्रकला आणि श्री गणेश मूर्ती बनविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, सकाळी ९ वाजता महिलांसाठी अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम होईल. सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामुळे सामाजिक बांधिलकी जपली जाणार आहे. याच दिवशी नवलाई भजन मंडळ आणि जागृती विकास महिला मंडळासह अन्य महिला मंडळांचे भजन कार्यक्रम होणार आहेत, ज्यामुळे महिलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत श्री सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत गणेशयाग आयोजित केला आहे. उत्सवाचा समारोप ७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता श्री रत्नागिरीचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीने होईल. या सोहळ्यासाठी सर्व गणेशभक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.

या कार्यक्रमांमध्ये स्थानिक कलाकारांना संधी देण्यासोबतच कोल्हापूर, मुंबई अशा शहरांमधील प्रसिद्ध कलाकारांचाही समावेश करण्यात आला आहे. समर्पण (ईशानी पाटणकर आणि कलाकार), सरगम (अमेय पंडित) आणि इतर अनेक मंडळे आणि कलाकारांचे कार्यक्रम उत्सवाला एक वेगळीच शोभा आणतील. या सर्व कार्यक्रमांची तयारी जोरात सुरू असून, उत्सव यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!