मुख्य बातमी

रत्नागिरीतील बाजारपेठेत पाणीच पाणी

रामआळी, गोखलेनाका, मारूतीआळीला फटका : व्यापारी, ग्राहकांची तारांबळ

रत्नागिरी : दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने शहरात दाणादाण उडवून दिली आहे. त्याचा सर्वाधिक फटका शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या वाहनधारकांना बसला. काल (१४ ऑगस्ट) पावसाचे पाणी शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या रामआळी, गोखलेनाका, मारूतीआळीत भरले होते. त्यामुळे व्यापारी, ग्राहकांची तारांबळ उडाली. काही दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे वस्तू व साहित्याचे नुकसान झाले. पादचाऱ्यांना पाण्यातून मार्ग काढतानाही कसरत करावी लागत होती.

गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सर्वत्र जोरदार पाऊस सुरू झाला आहे. या पावसाचा मोठा फटका रत्नागिरी शहराला बसला आहे. आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुख्य बाजारपेठेतील रामआळी, गोखलेनाका, मारूतीआळीमध्ये सुमारे दीड ते दोन फूट पाणी रस्त्यावरून वाहात होते. पाणी दुकानात शिरण्याची भीती निर्माण झाल्यामुळे व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. पाणी दुकानात शिरून नुकसान होऊ नये यासाठी दुकानदारांची धावाधाव सुरू होती. पावसामुळे ग्राहकांची वर्दळही कमीच होती. त्यामुळे पावसाने व्यापाऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले.

शहरात कोट्यवधीची गटारांची कामे करूनही सर्व पाणी रस्त्यावरून वाहत आहे. जास्त पाऊस पडतो, असे कारण सांगून राजकीय नेते त्यातून वेळ मारून नेतात; परंतु जास्त पावसाचा विचार करून गटारे का बांधली जात नाहीत याकडे कानाडोळा करत असल्याचे सर्वसामान्य नागरिकच बोलत आहेत. पालिकेच्या नियोजनाअभावी शहरातील रस्त्यांवर साचलेल्या पाण्याचा निचरा होताना दिसत नाही. काही ठिकाणी गटारांची उंची वाढलेली आणि रस्ते खाली असे चित्र आहे तर अनेक ठिकाणी गटारांचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे शहरातील पाण्याचा निचरा होणार कसा, असा प्रश्न पडलेला आहे.

दोन दिवसांच्या पावसाने रत्नागिरी शहरातील गटारे आणि रस्त्यांच्या कामांचे नियोजन याबाबत पालिका उघड्यावर पडली आहे. काँक्रिटचे मुख्य रस्ते सोडले तर अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. या खड्ड्यातून मार्ग काढताना नागरिक आणि वाहनचालकांना कसरत करावी लागते. ऐन पावसात खड्डे बुजवण्याचे काम पालिकेने हाती घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे; मात्र या पावसाने पालिकेची तयारी उघड्यावर पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!