रत्नागिरीत भव्य नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेचा जल्लोषात समारोप; भगवती स्पोर्ट्स किल्ला विजेता

रत्नागिरी : राजवाडी क्रीडा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भव्य नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेचा सांगता समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. अक्षय तृतीया निमित्त दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेला यंदाही क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
तीन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामना भगवती स्पोर्ट्स किल्ला आणि यंग बॉईज फगरवाठार यांच्यात अत्यंत चुरशीचा झाला. शेवटी दमदार खेळ करत भगवती स्पोर्ट्स किल्ला संघाने विजेतेपद पटकावले.
स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. अंतिम सामन्यानंतर संपूर्ण परिसरात क्रीडाप्रेमींमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.
यंदा राजवाडी क्रीडा मंडळाचे ७०वे वर्ष असून, त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बक्षीस वितरण सोहळा मंडळाचे अध्यक्ष सुधाकर मोंडकर, प्रवीण दळवी, सचिव प्रथमेश मोंडकर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
रत्नागिरी शहरात मानाची समजली जाणारी ही स्पर्धा यंदाही उत्साहात पार पडत भगवती स्पोर्ट्स किल्ला संघ विजेता ठरला आहे.



