आंबा घाट हत्या प्रकरण; प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

रत्नागिरी : तालुक्यातील येथील बेपत्ता असलेल्या तरुणीचा सायली देशी बारमध्ये दोन साथीदारांच्या मदतीने कट रचून खून केल्याची व तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह आंबा घाट परिसरात फेकून दिल्याची कबुली तिचा प्रियकर दुर्वास दर्शन पाटील (रा. वाटद खंडाळा जंगम वाडी) याने दिली आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
मिरजोळे येथील हेमंत जितेंद्र मयेकर यांनी बहिण बेपत्ता असल्याची फिर्याद रत्नागिरी शहर पोलीसात दिली. याप्रकरणी खंडाळा येथील बार व्यावसायिक दुर्वास दर्शन पाटील (वय ३०.) यास पोलीसांनी संशियत म्हणून ताब्यात घेतले. तपासात त्याने खून केल्याचे कबूल केले. शनिवारी दोन वाजता सहकारी आरोपींना घेऊन रत्नागिरी व देवरूख पोलिसांचे पथक घाटात दाखल झाले. आंब्यातील अपघात मदत पथकातील पंधरा तरुणांना पोलिसांनी पाचारण करून दरीतील मृतदेहाचा शोध घेतला व पथकाने दरीत उतरण्यास वाट तयार करून घेतली.
तीन तासानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, विवेक पाटील, मुख्य आरोपीस घेऊन घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह काढण्यास सव्वा पाचला मदत पथक दरीत उतरू लागले. सायंकाळ होऊ लागल्याने दरीत धुके दाटले होते. पावसाची रिपरिप चालूच होती. तीन दोरखंड गाडीच्या चालकाला बांधून त्याच्या सहाय्याने सहा तरुण घसरतच दरीत उतरले. वीस मिनिटांत मृतदेह प्लस्टिकमध्ये बंदिस्त करून रस्तावर आणला गेला. दरीत खाली साठ फूट खोल झाडीत मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला.
फिर्यादी व आरोपी व साक्षीदार यांच्या समक्ष मृतदेहाची ओळख पटवली. अंगावरील गुलाबी नक्षीकाम ड्रेस व हातावरील टॅटू वरून भाऊ हेमंत याने भक्ती बहीणाची ओळख पटवली. साडेसहानंतर साखरपा येथे आरोग्य केंद्रात शवविच्छेदनास मृतदेह नेला.
बारा दिवसांपूर्वीचा मृतदेह असल्याने चेहरा सडून कवटी शिल्लक राहीली होती. सतत पाऊस असल्याने दुर्गंधी पसरलेली नव्हती. आंबा गावातील मदत पथक सरसावले. आंबा घाटात अपघात असो की अन्य गुन्हेगारी घटना असो पोलीस अधिकारी येथील मदत पथकातील विजय पाटील, दिनेश कांबळे, दिनेश गवरे, दीपक भोसले, सागर चाळके, दिग्विजय गुरव, शंकर डाकरे यांच्यासह पंधरा तरुणांनी मृतदेह दरीतून वर घेण्यास योगदान दिले.
उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, विवेक पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, डीवायएसपी सुरेश कदम, हवालदार सचिन कामेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
भक्ती व दुर्वास यांचे दोन वर्षांपासून प्रेम संबंध होते. तिने लग्नाचा हट्ट धरला पण त्याने विरोध केला. प्रेयसी ऐकत नाही हे पाहता आपल्या जिवनातील अडथळा दूर करण्यासाठी तिचा खून करून तिचा मृतदेह रत्नागिरीपासून सत्तर किलोमीटरवरील गायमुख जवळील दरीत फेकून दिला. तिच्या खूनानंतर दोन दिवसांत त्याने दुसऱ्या मुलीशी साखरपुडा केल्याची संतापजनक बाब मयेकर कुटुंबीयांना समजली.
दरम्यान, दुर्वास पाटील मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. त्याच्या मालकीचे खंडाळा येथे बार व दारूचे दुकान आहे. दहा महिन्यांपूर्वी खंडाळा येथील तरुण बेपत्ता आहे. त्याचाही खून करून याच दरीत फेकल्याचे तपासात पुढे आले आहे. त्याचाही तपास करण्याचे ठरले होते पण धुके व अंधार पडू लागल्याने हा तपास पुढे ढकलण्यात आला.



