कुडली गावाच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सुरेंद्र रहाटे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील कुडली ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच नितीन शंकर गावणंग यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उत्साहात झाली. या सभेत तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी सुरेंद्र रहाटे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली.
या सभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती समिती गठीत करण्याचा विषय ग्रामसेवक सुनील कदम यांनी सभागृहासमोर मांडला. यावेळी संतोष रामचंद्र पावरी यांनी कुडली गावाच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सुरेंद्र शांताराम रहाटे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड व्हावी अशी सूचना मांडली या सूचनेला मनोहर नारायण निमकर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सुरेंद्र शांताराम रहाटे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
सुरेंद्र रहाटे यांनी यापूर्वी कुडली ग्रामपंचायत सदस्य असतानाही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच जि.प. मराठी शाळा कुडली नं. १ या शाळेचे व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उत्तम काम केले आहे. श्री. रहाटे यांना सामाजिक कार्याची आवड असून ते दुसऱ्यांच्या अडीअडचणीत धावून जातात.
गावातील सर्व समाजाला सोबत घेऊन गावातील एकोपा, बंधु-भाव ठेवण्यासाठी कटीबद्ध असल्याचे मत सुरेंद्र रहाटे यांनी व्यक्त केले. यावेळी सरपंच नितीन शंकर गावणंग, ग्रामसेवक सुनील कदम, उपसरपंच संतोष नारायण पावरी यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
या सर्वांनी नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष सुरेंद्र रहाटे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



