मुख्य बातमी

बुद्धविहाराची जागा ताब्यात घेण्यासाठी बौद्धांचा एल्गार  

रत्नागिरीत आंबेडकरी जनतेचा विराट मोर्चा  

रत्नागिरी : रत्नागिरीतील थिबा कालीन बुद्ध विहाराची जागा ताब्यात घेण्यासाठी बौद्ध जनतेकडून आज (२७ ऑक्टोबर) विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी बौद्धविहारासाठी आरक्षित ठेवलेल्या जागेत प्रशासनाच्या वतीने होऊ घातलेले कम्युनिटी सेंटरचे बांधकाम प्रक्रिया रद्द करावी, तसेच ती जागा बौद्ध समाजाला मिळावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आरपारची लढाई आंबेडकरी जनता लढेल, असा इशारा देखील देण्यात आला. यासंबंधीचे निवेदन मार्चानंतर जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना देण्यात आले.

थिबा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीच्यावतीने या बुद्धविहाराच्या बचावासाठी मार्चाचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी तालुक्यातील आंबेडकरी जनतेकडून मोठा प्रतिसाद या मोर्चाला लाभला. सोमवारी सकाळी ११.३० वाजता वाजता थिबा कालीन बुद्धविहाराच्या जागेत त्रिसरण पंचशील घेवून मार्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी भंत्ते सुमेधबोधी व भिक्खूगण उपस्थित होते. त्याचसोबत संघर्ष समितीचे अध्यक्ष एल. व्ही. पवार व कार्याध्यक्ष अनंत सावंत, सचिव अमोल जाधव, रत्नदीप कांबळे, प्रकाश पवार, दीपक जाधव व बौद्ध जनता उपस्थित होती.

थिबा कालीन बुद्धविहार येथून मोर्चा जेलरोड मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या इथे आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच जोरदार घोषणा यावेळी आंबेडकरी जनतेकडून देण्यात आल्या. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मार्चाला विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

समितीचे अध्यक्ष एल. व्ही. पवार यांनी सांगितले की, “आरक्षित जागेत होवू घातलेले कम्युनिटी सेंटर हेच बुद्धविहार आहे असे संबोधून बौद्ध समाजाची प्रशासनाकडून दिशाभूल केली जात आहे. पूर्वी पालकमंत्री यांनी बुद्धविहाराची जागा बौद्धांच्या ताब्यात दिली जाईल, असे सांगितले होते; मात्र आता ते शासनाची जमीन शासनाच्याच ताब्यात राहतील असे सांगत आहे. ही आंबेडकरी जनतेची फसवणूक आहे. त्यापासून आपण सावध राहिले पाहिजे. आज हा मोर्चा तालुक्याचा निघाला आहे, उद्या जिह्याचा निघेल व गरज पडली तर राज्याचा व देशपातळीवर मोर्चाचे स्वरुप नेले जाईल,” असा इशारा पवार यांनी दिल़ा

कार्याध्यक्ष सावंत म्हणाले, “थिबाराजा कालीन बुद्धविहार इंग्रज सरकारने थिबा राजा यांच्यासाठी त्यांचे इच्छेनुसार बांधून दिले होते. त्यावेळेपासून रत्नागिरी ही बौद्ध संस्कृतीने पवित्र झालेली भूमी आहे. बुद्ध विहाराची जागा ही एका विशिष्ठ कारणासाठी राखीव असून त्या जागेत बुद्ध विहार अस्तित्वात आहे, याची पूर्ण जाणीव असतानाही त्या जागेत कम्युनिटी सेंटर बांधण्यात येत आहे. अशा प्रकारे आरक्षित क्षेत्रामध्ये कम्युनिटी सेंटर बांधण्यास दिलेली परवानगी म्हणजेच बौद्ध समाजावर केलेला अन्याय आहे.”

यावेळी बोलताना सल्लगार प्रकाश पवार म्हणाले, “सुरुवातीला ट्रस्टकडून संबंधित जागेवर बुद्धविहार होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार आपण सर्व त्याठिकाणी उपस्थित राहिलो होतो; मात्र सहा महिन्यानंतर प्रशासनाने त्याठिकाणी कम्युनिटी सेंटर होणार असल्याचे सांगितले. ही एकप्रकार फसवणूक ट्रस्टच्या लोकांकडून करण्यात आली.”

भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष रत्नदीप कांबळे म्हणाले, “थिबा कालीन बुद्धविहाराची जागा बौद्धांच्या ताब्यात मिळावी यासाठी बौद्ध समाजाकडून लढल्या गेलेल्या १९९८ पासूनच्या लढ्याचा मी साक्षीदार आहे. आमच्या पूर्वजांनी या जागेचे जतन केले होते. तसेच त्याठिकाणी पूजापाठ घेण्यात येत होता; मात्र शासनाने ही जागा स्वतच्या ताब्यात घेतली असून कम्युनिटी सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हे समाजाला कदापि मान्य होणारे नाही. समाजाला देण्यात आलेली जागा समाजाच्या ताब्यातच शासनाने द्यावी.”

समितीचे उपाध्यक्ष प्रकाश प्रवार यांनी सांगितले की, “समाजातील लोकांना हाताशी धरून काही लोक समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजात काही दलाल थिबा राजा कालीन बुद्धविहाराची जागा शासनाच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र आंबेडकरी जनता त्यांचे मनसुबे कधीच सफल होऊ देणार नाही.” सल्लागार दीपक जाधव यांनी ट्रस्टच्या लोकांना अनेकवेळा चर्चा करण्यासाठी बोलविण्यात आले होते; मात्र ट्रस्टचे लोक उपस्थित राहिले नसल्याचे सांगितले. सुरुवातीला ज्यांनी जागेची मागणी केली त्यांचा विचार न करता २०२३ मध्ये ट्रस्टला जागा देण्यात आली व त्याठिकाणी कम्युनिटी सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला जात आहे, हे समाजाला मान्य होणारे नसल्याचे जाधव यांनी सांगितले.

यावेळी सचिव अमोल जाधव, भंन्ते सुमेधबोधी आदींनी देखील उपस्थितांना संबोधित केले.

माजी आमदार बाळ माने, माजी नगराध्यक्ष कीर यांचा पाठिंबा

बौद्ध समाजाकडून विहार बचावासाठी काढण्यात आलेल्या मार्चाला माजी आमदार व ठाकरे शिवसेनेचे उपनेते बाळ माने व माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी उपस्थिती लावली. यावेळी माने यांनी पालकमंत्री उदय सामंत हे जनतेची दिशाभूल करत आहेत तसेच समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली. तसेच विहार बौद्धांच्या ताब्यात देण्याला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तर माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी देखील राष्ट्रवादी पक्षाकडून पाठिंबा जाहीर केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!