कोतवडे येथे मुलींना एचपीव्ही लसीकरण आणि प्रमाणपत्रांचे वितरण

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र वेतोशी यांच्यामार्फत कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबई संचलित श्री वि. प. कोतवडे इंग्लिश स्कूल येथे ९-१४ वयोगटातील मुलींना पालकाच्या संमतीने एचपीव्ही लस देण्यात आली व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
२० नोव्हेंबर रोजी आयोजित या उपक्रमात “एचपीव्ही लसीचे भविष्यकाळात होणारे फायदे व या लसीमुळे मुलींचे होणारे संरक्षण” या विषयावर आरोग्य वर्धनी केंद्र कोतवडेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीमती पाखरे यांनी विद्यार्थिनींच्या पालकांचे समुपदेशन केले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार मदन कुलकर्णी, समुदाय आरोग्य अधिकारी गौरी कांबळे, एलएचव्ही दिव्यांका केतकर सिस्टर, आरोग्य सेविका लिना हातखंबकर, आशा सेविका वर्षा जोगळेकर व विद्या लांजेकर तसेच विद्यार्थिनी व माता पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सर्व शासकीय शाळांमध्ये एचपीव्ही ही लस ९ ते १४ वयोगटातील मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळण्यासाठी ही लस दिली जात आहे.
एचपीव्ही (HPV) म्हणजे काय?
एचपीव्ही म्हणजे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस. हा विषाणू लैंगिक संपर्कातून पसरतो. यामुळे गर्भाशय मुखाचा कॅन्सर तसेच इतर काही कॅन्सर होऊ शकतात. एचपीव्ही लस ही सुरक्षित व परिणामकारक आहे.
– ९ ते १४ वयोगटातील मुलींना मोफत लस उपलब्ध. गर्भाशय मुखाचा कॅन्सर टाळण्यासाठी लस हा प्रभावी उपाय.
– लहान वयात घेतलेली लस आयुष्यभर संरक्षण देते.
– लसीकरणानंतरही नियमित आरोग्य तपासणी आवश्यक.
– आई-वडिलांनी मुलींचे लसीकरण करून घ्यावे.
– कॅन्सरमुक्त समाजासाठी (HPV) लस घ्या इतरांनाही प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.



