लाच मागितल्याप्रकरणी गुहागर येथील उपअभियंता ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

गुहागर : तालुक्यातील एका ग्रामपंचायतीने केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी लाच मागणाऱ्या पंचायत समितीमधील बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय सळमाखे याला मंगळवारी (ता. १६) लाचलुचपत विभागाने ७ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
गुहागर तालुक्यातील वेळंब ग्रामपंचायतचे पत्रा शेडच्या कामांतर्गत साडेतीन लाखाचे रनिंग बिल काढण्यासाठी सात हजार रुपयांची लाच मागितली होती. हे काम करणाऱ्या उप ठेकेदाराला संबंधित कागदपत्रावर सही करण्यास नकार दिला. त्याला दोन वेळा केबिनच्या बाहेरही पाठवले. शेवटचं बिल काढताना कोणतीही रक्कम देऊ नको, पण मला आता कोणताही परिस्थितीत ७ हजार रुपये दे अशा पद्धतीची मागणी उप अभियंता सळमाखे यांनी तक्रारदाराकडे केली होती. संबंधित तक्रारदाराने शुक्रवारी लाचलुचपत विभागाजवळ संपर्क साधून संपूर्ण हकीगत सांगितली. त्याप्रमाणे मंगळवारी लाचलुचपत विभागाने सापळा रचला. तक्रारदार फोटोवर राहिलेली सही घेण्यासाठी कार्यालयात गेला असता उप अभियंता सळमाखे यांनी पुन्हा एकदा कागदपत्रावरील ग्रामसेवकाची सही नाही, असे सांगून त्याला बाहेर काढले. मात्र ग्रामसेवकाची सही आणल्यानंतर रक्कम आणली का ? असे विचारले. त्यानंतर तक्रारदाराने पाच हजार रक्कम साळमाखे यांना दिले. ती रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाचे अधिकाऱ्यांनी उपअभियंता सळमाखे यांना ताब्यात घेतले. पुढील याबाबतची अधिक कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.


