चालुक्य राजा सोमसिंह यांचा बाराव्या शतकातील कर्णेश्वर (संगमेश्वर) येथील शिलालेख उजेडात
कसबा (ता. संगमेश्वर) येथील कर्णेश्वर मंदिर परिसरातील वापी दान शिलालेख

रत्नागिरी : कसबा (ता. संगमेश्वर) येथील प्रसिद्ध कर्णेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात चालुक्य राजा सोमसिंह यांचा बाराव्या शतकातील शिलालेख उजेडात आला आहे. मंदिर परिसरातील एका मोकळ्या सुट्ट्या शिळेवर हा कोरला असून, या शिलालेखाचे संशोधक श्री. अनिल किसन दुधाणे आहेत. तसेच या संपूर्ण शिलालेखाचे वाचन अनिल दुधाणे व अथर्व पिंगळे यांनी केले आहे.
या शिलालेखाच्या वरील भागात चार आणि खालील भागात पाच अशा एकूण ९ ओळींचा मजकूर देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरला आहे, तर मध्यभागी गधेगळ शिल्प आणि सूर्य चंद्र शिल्प कोरलेले दिसते. या शिलालेखावर सततचा पाण्याचा अभिषेक आणि दैवतीकरण, तसेच वातावरणाचा परिणाम झालेला असून लेखातील काही अक्षरे पूर्णपणे झिजून गेली आहेत तर काही पुसट झाली आहेत. शिलालेखाच्या खालील भागातील कोपरा तुटलेला असून तेथे कोणताही मजकूर कोरलेला नाही.शिलालेखाचा छाप घेतला असता त्यावरील अक्षरे थोड्या प्रयत्नाने वाचता येतात.

श्री. दुधाणे यांनी केलेले शिलालेखाचे वाचन असे :
१. प्रमुषु सोम सपु
२. त्रीअ श्री सोमसिहा स्री
३. ल(ब्ध) म्हाराणगउ प्रषात
४. पुरुषी(?)
५. (अ)ड केली अवा वाडी नागा[ग]र…
६. हंजवाण माण[न]करु देसील…
७. चौधरी वाचुनी कुपाची प्रती
८. पालावे ह[हा] ध्रमु मोडी तेह[हा]
९. चिऐ अ[आ]इसी जवे
अर्थ : संगमेश्वर येथील चालुक्य राजाचा प्रमुख प्रधान सोमेश्वर याने त्यांच्या मुलाबाळासह चालुक्य वंशातील तत्कालीन शासक राजा श्री सोमसिंह महाराणक याने व इतर काही स्थानिक वाडीतील प्रतिष्ठित व्यक्तींनी मिळून विहीर (आड) बांधली. ही विहीर सार्वजनिक व धार्मिक उपयोगासाठी बांधलेली असून ती देवस्थानाशी संबंधित आहे. या विहिरीची देखभाल व संरक्षण करण्याची जबाबदारी हंजमाण व नागर (परदेशी/नगरवासी व्यापारी) श्रेणी, तसेच स्थानिक प्रशासकीय अधिकारी देसले (देसाई), व चौधरी. या सर्वांनी मिळून त्या विहिरीचा योग्य वापर, संरक्षण व देखरेख करावी, असा स्पष्ट आदेश दिला आहे. जो कोणी या धार्मिक व सामाजिक व्यवस्थेचा भंग करील, धर्म मोडेल किंवा या दानावर अतिक्रमण करील त्याच्या आईस गाढव लागेल असा अत्यंत कठोर व प्रतिकात्मक शापवचन दिले आहे.
शिलालेखाचे महत्त्व : हा शिलालेख प्रधान सोमेश्वर नावाच्या एका प्रमुख स्थानिक व्यक्तीशी संबंधित आहे. त्याच्या मुलांसह स्थानिक चालुक्य राजा श्री सोमसिंह महाराणक याने व इतर काही स्थानिक सहकारी व्यक्तींच्या सहभागाने, समाजोपयोगी कार्य म्हणून विहिरीचे (आडाचे) बांधकाम केले. श्री सोमसिंह महाराणक हा ‘महाराणक’ किताब धारण करणारा व्यक्ती असल्यामुळे तो एखादा स्थानिक सरदार, सामंत किंवा प्रशासकीय अधिकारी असण्याची दाट शक्यता आहे. यावरून केंद्रीय सत्तेखाली कार्य करणाऱ्या स्थानिक सत्ताकेंद्रांची रचना समजते. सोमेश्वर–सोमसिंह ही वंशपरंपरा स्थानिक नेतृत्वाच्या सातत्याकडे निर्देश करते .मध्ययुगीन ग्रामीण जीवनात पाण्याची व्यवस्था अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे, असे आड बांधणे हे मोठे पुण्यकार्य व धर्मकृत्य मानले जात असे. विहीर किंवा आडाचे बांधकाम हे त्या काळातील पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी केलेले मूलभूत उपाय होते. अशा जलस्रोतांचे बांधकाम खासगी व्यक्तींनी केले असले तरी त्यांचा उपयोग सार्वजनिक व देवस्थानाशी निगडित असायचा.
या कार्यात रोहित बलदे व संगमेश्वरमधील स्थानिक मोडी लिपी जाणकार आणि इतिहास अभ्यासक स्नेहल बने यांची विशेष मदत व सहकार्य लाभले. तसेच श्री देव कर्णेश्वर देवस्थान ट्रस्ट यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या संशोधनामुळे संगमेश्वर मधील पर्यटनाला व अभ्यासकांना फायदा होऊ शकतो त्या प्रमाणे या गधेगळचे जतन व संवर्धन करण्याचे प्रयत्न महत्त्वाचे असल्याचे मत संशोधक अनिल दुधाणे यांनी व्यक्त केले.



