जीपीएटी परीक्षा केंद्र परिसरात शनिवारी प्रतिबंधात्मक आदेश

रत्नागिरी : राष्ट्रीय परीक्षा बोर्ड, नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणारी ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट २०२६ ही ७ मार्च रोजी होणार आहे. परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्राच्या २०० ते ३०० मीटर परिसरात सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी लागू केला आहे.
राष्ट्रीय परीक्षा बोर्ड, नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणारी ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट ७ मार्च रोजी सकाळच्या सत्रामध्ये राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आंबव (मु. पो. आंबव देवरुख, ता. संगमेश्वर) या परीक्षा केंद्रावर सकाळी ९ ते दुपारी १२ वाजता या वेळेत होणार आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारान्वये परीक्षा केंद्राच्या २०० ते ३०० मीटर परिसरात परीक्षेच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी ७ मार्च रोजी परीक्षेच्या दिवशी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी लागू केले आहेत.
या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. २०० ते ३० मीटर परिसरातील एसटीडी बुथ, झेरॉक्स सेंटर, टायपिंग सेंटर, ध्वनीक्षेपण इ. माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यास मनाई असेल. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस / वाहनास प्रवेशास मनाई राहील.
हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी/कर्मचारी तसेच परीक्षा केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी/पोलीस अधिकारी यांच्याबाबत त्यांचे परीक्षा संबंधी कर्तव्य पार पाडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत. मात्र, त्यांना गैरप्रकार करण्यास प्रतिबंध राहील.
या आदेशाची जो अवमान्यता करील तो भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.



