रत्नागिरी जिल्ह्यातील किनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी जिल्हा पोलिसांची गस्त

रत्नागिरी : सध्या सुट्टीचा हंगाम असल्यामुळे विविध भागातून पर्यटक मोठ्या प्रमाणावर कोकणात आले आहेत. कोकणातील नयनरम्य समुद्रकिनारे हे पर्यटकांचे मोठे आकर्षण आहेत. जिल्ह्यातील अनेक समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीने भरून गेले आहेत. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच अती उत्साही पर्यटकांच्या उत्साहाला चाप बसावा यासाठी जिल्ह्यातील किनाऱ्यावर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे गस्त घातली जात आहे.

काही अतिउत्साही पर्यटन किनाऱ्यावर दुचाकी अथवा चार चाकी चालवून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करतात; मात्र अनेकदा गाडीचे चाक अडकल्यामुळे वाळूत धोकादायक परिस्थिती निर्माण होते आणि त्याचा नाहक त्रास पर्यटकांबरोबरच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनाही होतो. अशा अतिउत्साही पर्यटकांना चाप बसण्यासाठी काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस दलाने समुद्रकिनाऱ्यावर कोणतेही वाहन देण्यास मज्जाव केला होता. पोलिसांनी बंदी घालूनही काही अति उत्साही पर्यटक वाहने समुद्राच्या पाण्यात नेत आहेत. हर्णे किनारी असा प्रकार घडल्यानंतर आता पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत.

जिल्ह्यातील किनाऱ्यांवर पर्यटकांनी मोठी वाहने नेऊ नयेत यासाठी आता बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत. याशिवाय निसर्गाचा, पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांना कोणताही धोका होऊ नये यासाठी त्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस मोठ्या प्रमाणावर समुद्रकिनाऱ्यावर गस्त घालत आहेत. किनाऱ्यावर सायकल व इतर माध्यमातून पोलिसांची गस्त सुरू असल्याने पर्यटकांना सुरक्षित वाटत आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे पर्यटकांकडून स्वागत करण्यात येत आहे.





