कोतवडे हायस्कूलमध्ये स्काऊट गाईड मेळावा उत्साहात

रत्नागिरी : कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबई संचलित श्री. वि. प. कोतवडे इंग्लिश स्कूल कोतवडेमध्ये २४ मार्च रोजी इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकडून स्काऊट गाईड एक दिवसीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी स्काऊट गाईड मेळाव्यासाठी शाळेतील स्काऊट गाईड विभागाचे शिक्षक यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संजय मयेकर, शाळा समिती अध्यक्ष नरेश कांबळे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विठ्ठल लांजेकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. पवार, स्काऊट गाईड विभागाचे शिक्षक श्री. कोलगे, श्री. खरात, श्री. लिंगायत, सौ. पेडणेकर, श्रीमती मोहिते यांनी विशेष मेहनत घेतली यावेळी शाळेची ज्येष्ठ शिक्षक श्री. नाईक खुळे, श्रीमती सुर्वे, श्री. जाधव, संदीप कोलगे, सौ. कामतेकर, सौ. शितूत, शिक्षकेतर कर्मचारी प्रमोद पांचाळ व श्रीमती खांडके यांची उपस्थिती होती.
सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांनी आपल्याला राहण्यासाठी निवारा म्हणून तंबूची उभारणी केली. त्यानंतर स्काऊट गाईडचे नियम, स्काऊट गाईड प्रतिज्ञा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या व अतिशय काळजीपूर्वक हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले. तंबू अतिशय उत्तम पद्धतीने नैसर्गिक वस्तूंचा उपयोग करून सजविले गेले होते. त्याचप्रमाणे बिन भांड्याचे पदार्थ व चुलीवरच्या पदार्थांची पाककृती विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने व आनंदाने बनविली. या खाद्य संस्कृतीमध्ये अनेक पदार्थ अतिशय चविष्ट व आकर्षक बनविण्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपलं कौशल्य दाखविले.
हा कार्यक्रम राकेश पवार यांच्या सहकार्याने आयोजित केला होता. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व मुलांचे कौतुक केले व अशाच प्रकारचा कार्यक्रम याही पुढे व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.



