खोडदे (गुहागर) येथे ब्लॅक पॅंथरचे दर्शन; ग्रामस्थ भीतीच्या छायेत

आबलोली (संदेश कदम) : जंगले मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने वन्य प्राणी मानव वस्तीकडे वळत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. असा प्रकार नुकताच (ता. गुहागर) खोडदे देऊळवाडी- खापलेवाडी -डिंगणकरवाडी रस्त्यावरील कातळांबाजवळ घडला. या ठिकाणी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास काळ्या बिबट्याचे (ब्लॅक पॅंथर) दर्शन झाल्याने प्रचंड घबराट उडाली असून वन खात्याने ब्लॅक पॅंथरचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत असल्याचे प्रत्यक्षदर्शी सर्वेश साळवी व भूषण पवार यांनी सांगितले. या घटनेकडे वन विभागाने गांभीर्याने बघावे आणि त्वरित लक्ष देऊन ताबडतोब ब्लॅक पॅंथरचा बंदोबस्त करावा, अन्यथा ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे कठीण होईल.
सुमारे सहा महिन्यांपूर्वी खोडदे येथील प्रगतशील शेतकरी रमाकांत साळवी यांच्या चिरेबंदी वाड्याचा दरवाजा तोडून वाड्यात घुसून वाघाने वासराला मारले होते. या घटनेची धास्ती आजही ग्रामस्थांमध्ये आहे. त्यामुळे काल काळ्या बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वन खात्याने ताबडतोब ब्लॅक पॅंथरचा बंदोबस्त करावा. तसेच वन खात्याने जंगल वाढीसाठी नियोजन करावे अशी मागणी आता ग्रामस्थ करत आहेत.
दरम्यान, ब्लॅक पॅंथर दिसल्याची माहिती सर्वेश साळवी यांनी वन विभागाला दिली आहे. तसेच ब्लॅक पॅंथर चित्रीकरण भूषण पवार यांनी केले आहे.



