मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आंबव पोंक्षे गावात रानरेड्यांकडून मोठे नुकसान

संगमेश्वर : तालुक्यातील आंबव पोंक्षे गावात रानरेड्यांकडून मोठे नुकसान होत आहे. शिवाय दिवसाढवळ्या पुढ्यात येत असल्याने गावातील नागरिक, वाहन चालक भीतीच्या छायेत वावरत आहेत.

गतवर्षी गावातील पकडेवाडी, भुवड वाडीच्या भागात तसेच तुरळ हरेकरवाडीकडील डोंगराळ व गवताळ भागात हे गवे मोठ्या संख्येने आढळून येत होते; परंतु सध्या संपूर्ण गावातच हे रानरेडे दृष्टीस पडत आहेत. आरवली आंबव पोंक्षे व आंबव पोंक्षे सरंद या रस्त्यावर झुंडीने हे रानरेडे दिसत असल्याने पादचारी, दुचाकीस्वार या मार्गावरून ये-जा करायला कचरत आहेत.

या रानरेड्यांकडून नव्याने लागवड केलेल्या आंबा काजूंच्या झाडांची नासधूस सुरु आहे. झाडे पिळवटून टाकत असल्यामुळे एका एका शेतकऱ्याची शेकडोंनी केलेली काजू, आंबा लागवड नेस्तनाबूत झाली आहे. शिवाय या वर्षी पकडेवाडी, भुवड वाडी या भागातील पावटा, चवळी, कुळीथ, कडव्याची शेतीची नासधूस केल्यामुळे शेतातून काहीच उत्पन्न हाती लागले नाहीत.

सध्या आंबव पोंक्षे गावात वन्य जीवांकडून मोठे नुकसान होत आहे. माकडांकडून आंबा, चिकू, केळी, शेवगा, पपई, फुलझाडे, यांचे नुकसान, तर डुक्करांकडून आरारोठ, कणगरे आदींचे नुकसान झाले आहे. त्यात आता रानरेड्यांची भर पडली आहे.

गावात दिवसा ढवळ्या कोल्हे देखील पहायला मिळत आहेत. आधीच असलेली बिबट्यांची दहशत व आता रानरेड्यांची भीती यामुळे ग्रामस्थ आपल्या स्वतःच्या जागेत, डोंगराळ भागात शेतीच्या कामाला जायला देखील कचरत आहेत. रानरेड्यांसह अन्य वन्य प्राण्यांचा वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी सरपंच शेखर उकार्डे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!