मुख्य बातमी

वर्षभरात पावणेतीन कोटींचे ५५ हजार लिटर मद्य जप्त

रत्नागिरी : अवैध मद्यावर राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाची करडी नजर असून, अवैध मद्याची निर्मिती, वाहतूक, तसेच विक्री विरुद्ध या विभागाकडून सातत्याने कठोर कारवाई करण्यात येत आहे. वर्षभरात या विभागाने एकूण १,१९९ गुन्हे नोंद केले असून, १,०५६ आरोपींना अटक केली. १४ वाहनांसह एकूण २ कोटी ७२ लाख ५७ हजार ८७६ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्कच्या रत्नागिरी विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती व विक्री होणाऱ्या ठिकाणांचा शोध घेऊन कारवाई करणे, परराज्यातील बेकायदेशीर मद्याची अवैध वाहतूक रोखणे, रात्रीची गस्त घालून संशयित वाहनांची तपासणी करणे, मद्याची अवैधपणे विक्री करणारे चायनिज सेंटर, हॉटेल्स, ढाबे यांचा शोध घेणे, तसेच अवैध दारू-धंद्यांना प्रतिबंध करण्याच्या सूचना सर्व कार्यकारी व भरारी पथकाच्या युनिटना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार पथकांकडून जानेवारी ते डिसेंबर २०२५ या वर्षात अवैध मद्यावर सातत्याने कारवाई केली आहे. या कालावधीत ५५,६३५ बल्क लिटर देशी – विदेशी मद्य जप्त केले. तसेच, २,४६,४२० लिटर रसायन नष्ट केले.

मुंबई-गोवा, कोल्हापूर-रत्नागिरी, चिपळूण-कराड या महामार्गावरून प्रवासी, तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. गोवा राज्यातून रेल्वेद्वारे अवैध मद्याची वाहतूक होऊ नये, यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून रेल्वे पोलिसांसमवेत अचानक प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात येते. हातभट्टी दारूची निर्मिती होणाऱ्या हॉटस्पॉटवर विशेष मोहिमा राबविल्या जात आहेत.

अवैध मद्याविरुद्धची कारवाई या पुढेही सुरूच राहील. जिल्ह्यात कोठेही हातभट्टी दारूची निर्मिती, विक्री, परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक व मद्यसाठा, बनावट माडी विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास या विभागाचा व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ व टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ यावर संपर्क साधावा. अवैध मद्यासंदर्भात माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येते, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरीच्या अधीक्षक किर्ती शेडगे यांनी केले आहे.

३१ डिसेंबर रोजी नववर्षाच्या स्वागतासाठी १७ जणांनी एकदिवशीय तात्पुरती क्लब अनुज्ञप्ती या कार्यालयाकडून मिळविली. त्यातून या विभागाला ९६,७०० रुपयांचा महसूल मिळाला.

एकूण १,२३७ प्रस्ताव जिल्ह्यातील विविध उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी ३१ प्रकरणात १९,२५,००० रुपयांची चांगल्या वर्तणुकीची बंधपत्रे आरोपींकडून घेण्यात आली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!