रत्नागिरीत पाणी कपातीचे संकट टळले
शीळ धरण २० जूनपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठी : पाणी सभापती निमेश नायर

रत्नागिरी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाच्या पाणीसाठ्याबाबत महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती समोर आली असून, सद्यस्थितीत शहरावर पाणी कपातीचे कोणतेही संकट नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पाणी सभापती निमेश नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मे रोजी शीळ धरणाची पाणी पातळी ११२.५५ मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे. धरणात सध्या ०.९०३ दशलक्ष घनमीटर म्हणजेच सुमारे ९०३ एमएलडी पाणीसाठा उपलब्ध आहे. वाढत्या उन्हामुळे होणारे बाष्पीभवन लक्षात घेता, दररोज २५ एमएलडी पाण्याचा उपसा आणि बाष्पीभवन धरले, तरीही हा साठा पुढील ३५ दिवस म्हणजेच साधारण २० जूनपर्यंत शहराची तहान भागवण्यासाठी पुरेसा आहे.
मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हात अनेकदा पाणीटंचाईची समस्या भेडसावते, मात्र यंदा धरणातील साठा समाधानकारक असल्याने प्रशासनाने तुर्तास पाणी कपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत म्हणजेच जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत हा साठा पुरणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाणी सभापतींनी दिलेल्या या तांत्रिक माहितीमुळे धरणातील पाणीसाठ्याबाबतचे संभ्रम दूर झाले असून, पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहनही यानिमित्ताने करण्यात आले आहे.



