मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

राजापूर बाजारपेठेत नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम 

कायमस्वरूपी उपाययोजनेची नागरिकांची मागणी

राजापूर : शहरातील रस्त्यांवर, फुटपाथवर व्यापारी, हातगाडी चालक आणि फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणाविरोधात राजापूर नगरपालिकेने आज (२० मे) धडक कारवाई केली. अतिक्रमणामुळे वाहनचालकांना, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राजापूर पालिकेने धडक मोहीम राबवत बाजारपेठेतील अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली.

गेल्या अनेक दिवसांपासून बाजारपेठेतील मुख्य रस्ते आणि फुटपाथवर दुकानदारांनी शेड, फलक तसेच विविध साहित्य मांडून अतिक्रमण केले होते. अनेक ठिकाणी हातगाड्या आणि फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठीही जागा उरत नव्हती. परिणामी वाहतुकीची कोंडी होत असून नागरिकांना रोजच त्रास सहन करावा लागत होता. पालिकेने यापूर्वी संबंधित अतिक्रमणधारकांना वारंवार नोटिसा बजावल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून अतिक्रमण कायम ठेवण्यात आले. त्यामुळे अखेर बुधवारी नगरपरिषदेने आक्रमक भूमिका घेत कारवाईचा बडगा उगारला.

कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम, स्वच्छता व इतर विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे बाजारपेठेत मोहीम राबवली. रस्ते आणि फुटपाथवर आलेले बेकायदा शेड, पाट्या, स्टॉल तसेच अन्य साहित्य हटवण्यात आले. या कारवाईनंतर काही काळासाठी बाजारपेठ मोकळी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. वाहतूक सुरळीत झाली असून नागरिकांनीही समाधान व्यक्त केले.

मात्र, ही कारवाई तात्पुरतीच ठरणार की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यापूर्वीही अशाच मोहिमा राबवण्यात आल्या होत्या; परंतु काही दिवसांतच पुन्हा अतिक्रमण झाल्याचा अनुभव आहे. त्यामुळे नियमित देखरेख, कठोर दंडात्मक कारवाई आणि कायमस्वरूपी नियोजनाशिवाय बाजारपेठेतील समस्या सुटणार नाही, असे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.

दरम्यान, पुढील काही दिवसांत बाजारपेठ पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात अडकते की पालिकेची कारवाई सातत्याने सुरू राहते, याकडे आता राजापूरकरांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!