महाराष्ट्रमुख्य बातमी

मान्सून केरळच्या किनारपट्टीवर ४ जूनला धडकण्याची शक्यता; राज्यात वादळी पावसाचा अंदाज

मुंबई : देशभरातील बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर मान्सूनचा वेग अचानक मंदावला आहे.अंदमान समुद्रात नियोजित वेळेपूर्वीच दाखल झालेला आणि श्रीलंकेपर्यंत मजल मारलेला हा मान्सून, भारताच्या अगदी सीमेजवळ पोहोचताच रेंगाळला आहे. मात्र याचे कारण समोर आले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात सक्रिय असलेली चक्रीवादळाची हवामान प्रणाली आणि वाऱ्यांच्या दिशेत झालेला बदल झाल्याने मान्सून थबकला आहे. हवामान विभागाने सुरुवातीला मान्सून केरळमध्ये २६ मे च्या सुमारास दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता; मात्र, आता तो ३ ते ४ जून दरम्यान केरळच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. यामुळे यंदा महाराष्ट्रातही मान्सून उशिरा दाखल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा हे शुक्रवारी मान्सूनचा दुसरा आगाऊ अंदाज जाहीर करणार आहेत.

त्यानंतर हवामानाची स्थिती अधिक स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. हवामानतज्ज्ञ आणि ‘स्कायमेट’चे अध्यक्ष जे.पी. शर्मा यांच्या मते, या वर्षी मान्सूनचे आगमन संथ असू शकते. त्यांच्या मते, जरी मान्सून ३ किंवा ४ जूनपर्यंत केरळमध्ये पोहोचला, तरी त्याची सुरुवातीची गती कदाचित मंदच राहील आणि तो उत्तर भारताच्या दिशेने वेगाने पुढे सरकणार नाही. त्यांनी या स्थितीला मान्सूनचे “मृदू आगमन” असे संबोधले आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, मान्सूनची हालचाल सध्या पूर्णपणे सागरी वाऱ्यांवर अवलंबून आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळ प्रणालीने मान्सूनच्या वाऱ्यांना आपल्या दिशेने खेचून घेतले आहे.परिणामी, अरबी समुद्रातून केरळच्या दिशेने पुढे सरकणारे, बाष्पाने भरलेले नैऋत्य मोसमी वारे कमकुवत झाले आहेत. याच कारणामुळे मान्सूनची वाटचाल थांबली आहे आणि त्याची उत्तरेकडील गती मंदावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!