सुनीताबाई – पु. ल. सेवाव्रती पुरस्कार चिपळूणच्या ‘सांजसोबत’ला
सुनीताबाई देशपांडे जन्मशताब्दी उपक्रम

रत्नागिरी : आयुष्याच्या संध्याकाळाकडे झुकलेल्या आजी आजोबांच्या सुरकुतलेल्या हातांमध्ये हात देऊन त्यांची संध्याकाळ सुलभ करणाऱ्या चिपळूणच्या सांजसोबत संस्थेला सुनीताबाई – पु. ल. सेवाव्रती पुरस्कार देण्यात येणार आहे. २५ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप असून, सुनीताबाई देशपांडे जन्मशताब्दी उपक्रमात सकाळच्या सत्रात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन प्रायोजित आणि आर्ट सर्कल आयोजित सुनीताबाई देशपांडे जन्मशताब्दी उपक्रम रत्नागिरीत आजपासून सुरू झाला आहे. सुनीताबाई आणि पु. ल. यांनी लाखोंच्या देणग्या देऊन खूप साऱ्या संस्थांना उभे राहण्यासाठी मोठे सहकार्य केले. त्यांच्या आर्थिक पुढाकाराने उभ्या राहिलेल्या मुक्तांगणसारख्या संस्था आज समाजाच्या आधारवड आहेत. या व्यतिरिक्त आधीपासून अस्तित्त्वात असणाऱ्या आयुका आनंदवनसारख्या संस्थांचे हात त्यांनी अधिक बळकट केले. त्यांच्या या दातृत्वाला सलाम म्हणून हा पुरस्कार देण्यात येत आहे.
सांजसोबत ही संस्था ‘देश माझा मी देशाचा – देशाची समस्या माझी समस्या – मीच सोडवणार’ या त्रिसूत्री वर काम करते. कोकणात खूप आडगावात वृद्ध, निराधार लोकांची संख्या प्रचंड आहे. वयाची सत्तरी पार केलेल्या वृद्धांना मूलभूत गरजा भागवणेही अनेकदा अशक्य होते. सरकारी मदत पुरत नाही आणि वयपरत्वे मोल-मजुरीची कामही मिळत नाहीत. अशावेळी त्यांच्या पाठीशी सांजसोबत उभी राहते. या मूलभूत गरजांसाठी मदतीचा हात देते. शारीरिक असमर्थता आणि गरिबी या दोन्हींनी हतबल असलेल्या वृद्धांसाठी सांजसोबत काम करते. आजवर “सांजसोबत”ने ८० वृद्ध दत्तक घेतले आहेत.
समाजमाध्यमातून त्यांचे सध्या २५० सभासद आहेत. प्रत्येक सभासद दर महिन्याला अगदी १०० रुपयांपासून जमेल तेवढी रक्कम जमा करतात. आलेल्या रकमेतून आवश्यक किराणा सामान या मंडळींना घरपोच केले जाते.
तसेच महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीतसुद्धा सांजसोबतने मराठवाडा परिसरात ३ हजार पूरग्रस्तांपर्यंत धान्य, औषधे आणि अत्यावश्यक सेवा पुरवल्या. शेकडो व्यावसायिकांना थेट मदतीचा हात दिला.



