मुख्य बातमी

रत्नागिरी जिल्हा महिलास्नेही, बालस्नेही बनवूया : श्रीनिवास सावंत 

पॉश ॲक्ट, बालकायद्याबाबत प्रशिक्षण

रत्नागिरी : “रत्नागिरी जिल्हा हा महिलास्नेही आणि बालस्नेही बनण्यासाठी आपण साऱ्यांनी प्रयत्न करावयाचे आहेत. जिल्ह्यातील वातावरण महिला व बालक यांच्यासाठी पूर्णपणे सुरक्षित कसे करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करावयाचे आहेत. या दिशेने केलेल्या जागृतीने महिलांचा आत्मसन्मान, आत्मभान आणि बालकांना त्यांच्या जगण्याचे सर्व अधिकार देता येतील,” असे वातावरण जिल्ह्यात निर्माण करण्यासाठी आपण हातभार लावूया, असे प्रतिपादन ऑक्झिलियम एम्पॉवरमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड संस्थेचे संचालक श्रीनिवास सावंत यांनी केले.

संस्थेच्या वतीने कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, निवारण आणि मनाई कायदा अर्थात् पॉश ॲक्ट, तसेच पॉक्सो २०१२, बालहक्क आणि बालविवाह कायदा या विषयांवर आधारित ३ दिवसांचे प्रशिक्षकांचे प्रशिक्षण २९ ते ३१ मे रोजी रत्नागिरीत पार पडले. संस्थेचे संचालक श्रीनिवास सावंत यांनी प्रशिक्षणामागचा उद्देश आणि प्रशिक्षणाचे स्वरूप स्पष्ट केले. बालसंरक्षण अधिकारी समृद्धी वीर, पीएसआय अभय तेली, जिल्हा महिला बालविकास अधिकारी मनोज पाटणकर यांनी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि सामाजिक जनजागृतीविषयी मार्गदर्शन केले.

कायदेसल्लागार विकास सावंत यांनी कायद्याचा (पॉशचा) इतिहास, त्याची निर्मिती आणि सद्यःस्थितीत कायद्यात झालेले बदल याची माहिती दिली. आपण केवळ कायद्याचे प्रशिक्षक नाही तर सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि संवेदनशील समाज निर्माण करण्याच्या प्रक्रियेतील महत्वाचे घटक आहोत, असे श्रीनिवास सावंत यांनी सांगितले. तसेच अॅड. विनया घाग आणि शिरीष दामले यांनी बालहक्क आणि बालकांविषयी विविध कायदे, तसेच बालमजुरी, बालविवाह, मानवी तस्करीबाबत मार्गदर्शन केले. Child And Community

Development Trust and Jeevan Anand संस्थेचे प्रमुख रामचंद्र अडसुळे, संरक्षण अधिकारी दीपाली चांदबोधले आदी उपस्थित होते.

बालके ही समाजातील सर्वात संवेदनशील घटक असतात. त्यांना कौटुंबिक हिंसाचार, बालमजुरी, बालविवाह, मानवी तस्करी आणि लैंगिक शोषणापासून वाचवणे अत्यंत गरजेचे आहे. बालपणीच त्यांच्यावर अन्याय झाला तर त्याचा परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर आणि पर्यायाने देशाच्या प्रगतीवर होतो. संकटात सापडलेल्या, पळून आलेल्या किंवा शोषणाला बळी पडलेल्या मुलांसाठी १०९८ हा २४ तास सुरू असणारा मोफत राष्ट्रीय आपत्कालीन फोन नंबर आहे. कोणतीही व्यक्ती बालशोषणाविरूद्ध या नंबरवर तक्रार किंवा माहिती नोंदवू शकते, हे मुद्दे मार्गदर्शनात होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!