…म्हणूनच मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून माघारी घेतली : बाळ माने

रत्नागिरी : मतदार तीर्थयात्रेला गेल्यामुळे मला मतं मिळणार नाही हे मला समजलं होतं म्हणून मी उमेदवारी अर्ज मागे घेतला अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे उमेदवार बाळ माने यांनी व्यक्त केली आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मला विधान परिषद निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली होती. आज उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. दोन दिवसांपूर्वी छाननी झाली त्यामध्ये सहाच्या सहा उमेदवार वैद्य ठरले होते. या निवडणुकीमध्ये १०१८ मतदार आहेत. त्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून मी चाचपणी केली असता आमचं मतदान २०० च्या आसपास होतं. लोकशाहीमध्ये निवडणुका लढवल्या पाहिजेत. बिनविरोध होता कामा नये या मताचा मी होतो. मी काही मतदारांना भेटण्याचा प्रयत्न केला; परंतु काही मतदार तीर्थयात्रेला गेल्याचे मला समजलं.”
ते पुढे म्हणाले, “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल या चिन्हावरचे जवळपास ५५ मतदार होते. मी इतर घटक पक्षांना सूचक म्हणून सह्या द्याव्यात म्हणून विनंती केली होती. मी अनेक वेळेला सह्या मागून सुद्धा घटक पक्षातील मतदारांकडून सूचक म्हणून सह्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार सुरू झाल्याच्या काही गोष्टी माझ्या कानावर यायला लागल्या. त्यामुळे मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठांना बोललो की अशाप्रकारे घोडेबाजार करून निवडणुका लढणं हे काही कोकणाच्या संस्कृतीला धरून नाही आणि या सगळ्याचा विचार करून मी माझा उमेदवारी अर्ज ४ रोजी माघारी घेतला.”
नितेश राणे यांच्या उपस्थितीबाबत ते म्हणाले की, “नितेश राणे हे कोकणचे मंत्री आहेत व कोकणच्या विकास मुद्द्यावरती त्यांचं नेहमी लक्ष असतं; परंतु मी जो निर्णय घेतला आहे तो घोडेबाजार टाळण्यासाठी मी हा उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला आहे. मी भाजपमध्ये जाईन की नाही जाईन याबाबतचा अद्याप काहीही निर्णय नाही. जुईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज भरला होता त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की मतांचे डिव्हिजन होईल मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे मतांचे डिव्हिजन होण्याची शक्यता फार कमी राहिली होती. राणे साहेबांच्या कुटुंबाशी माझे घरगुती संबंध असल्यामुळे ते आज माझ्यासोबत इथे आहे. मी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा एकमेव कारण असं होतं की मित्र पक्षांच्या मतदारांचे सूचक म्हणून सह्या मला मिळत नव्हत्या बरेचसे मतदार तीर्थयात्रेला गेल्याची मला समजले.”



