आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमी

राज्यात लम्पीविरुद्ध युद्धपातळीवर मोहीम; ३७.५२ लाख गोटपॉक्स लसमात्रांचे वाटप सुरू

पशुपालकांसाठी टोल फ्री क्रमांक १९६२ वर घरपोच उपचार; लसीकरण गतिमान करण्याचे आयुक्त डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

रत्नागिरी : राज्यातील गायवर्ग पशुधनाला लम्पी चर्मरोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला आहे. सन २०२६-२७ या वर्षाकरिता आवश्यक असलेल्या गोटपॉक्स लसमात्रांचे उत्पादन ‘पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे’ येथे यशस्वीपणे सुरू झाले आहे. २१ व्या पशुगणनेनुसार राज्यातील जिल्ह्यानिहाय गोधनाची संख्या विचारात घेऊन, पहिल्या टप्प्यात एकूण उत्पादनाच्या ४० टक्के म्हणजेच ३७ लाख ५२ हजार लसमात्रांचे वाटप नियोजनबद्ध रीतीने सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर व तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

लसीकरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्थेचे सहआयुक्त डॉ. याहयाखान पठाण यांनी जिल्हा उपआयुक्तांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. क्षेत्रीय स्तरावर लस पोहोचवताना तिची ‘शीत साखळी’ कुठेही खंडित होणार नाही, याची काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच, लस प्राप्त होताच जिल्ह्यातील अधिक दूध देणाऱ्या व उच्च उत्पादनक्षमता असलेल्या पशूंना प्राधान्याने लस देण्यात यावी आणि लसीकरणाचा दैनंदिन अहवाल दररोज सकाळी ११ वाजेपर्यंत सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

गतवर्षी ज्या तालुक्यांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून आला होता, त्या ‘हॉटस्पॉट’ भागांमध्ये प्राधान्य क्रमाने लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. या व्यापक मोहिमेसाठी जिल्ह्यातील सहकारी दूध संघ, स्वयंसेवी संस्था तसेच खाजगी पशुवैद्यक व सेवादाते यांचेही सक्रिय सहकार्य घेण्याचे आवाहन जिल्हास्तरीय यंत्रणेला करण्यात आले आहे.

“लम्पी चर्मरोगासारख्या संसर्गजन्य आजारांपासून गोधनाची सुरक्षा करणे हे पशुसंवर्धन विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पशुधन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि शेतकरी बांधवांचा मुख्य कणा असल्याने त्यांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी गोटपॉक्स लसीकरण हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. पशुपालकांनी या मोहिमेला पूर्ण सहकार्य करावे,” असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

पशुपालकांसाठी महत्त्वाची माहिती :

टोल फ्री क्रमांक : १९६२ (एका कॉलवर घरपोच पशुवैद्यकीय उपचार उपलब्ध)

प्राधान्य : अधिक दूध देणारी जनावरे आणि गतवर्षीचे प्रादुर्भावग्रस्त (हॉटस्पॉट) तालुके.

लस निर्मिती : पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!