आरोग्यमुख्य बातमी

रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मोफत डायलिसिस सुविधा

किडनी विकारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा

रत्नागिरी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या डायलिसिस विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील किडनी विकारग्रस्त रुग्णांना अत्याधुनिक व मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध होत असून महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत हजारो रुग्ण या सेवेचा लाभ घेत आहेत. या सुविधेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पूर्वी डायलिसिस उपचारासाठी रुग्णांना कोल्हापूर, मुंबई किंवा खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत असे. यासाठी मोठा आर्थिक खर्च आणि प्रवासाचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आता रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातच मोफत, दर्जेदार व तज्ज्ञांच्या देखरेखीखाली डायलिसिस उपचार उपलब्ध झाल्याने रुग्णांना त्यांच्या जिल्ह्यातच प्रभावी आरोग्यसेवा मिळत आहे.

डायलिसिस विभागातील उपचार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर तसेच अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली केले जातात. या विभागात वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तमराव कांबळे, मूत्रपिंड तज्ज्ञ डॉ. अमेय बेडेकर, प्रशिक्षित तंत्रज्ञ व परिचारिका यांच्या समन्वयातून रुग्णांना गुणवत्तापूर्ण सेवा दिली जाते.

डायलिसिस उपचारासोबतच रुग्णांना आवश्यक असलेल्या रक्त तपासण्या तसेच उपचारासाठी लागणारी महत्त्वाची इंजेक्शन्सही पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जातात.

सन २०१३ मध्ये सुरू झालेल्या डायलिसिस विभागात सध्या १६ डायलिसिस बेड व मशीन कार्यरत असून त्यापैकी २ मशीन व बेड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी स्वतंत्र आयसोलेशन कक्षात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने भविष्यात डायलिसिस बेड व मशीनची संख्या वाढविण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.

रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्यसेवेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली असून दरमहा हजारो रुग्ण बाह्यरुग्ण (ओपीडी) व आंतररुग्ण (आयपीडी) सेवांचा लाभ घेत आहेत. विशेषतः डायलिसिस विभागामुळे ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांचा उपचारावरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला असून त्यांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण उपचाराची हक्काची संधी उपलब्ध झाली आहे.

सध्या दरमहा ७० ते ८० रुग्ण नियमित डायलिसिस सेवा घेत असून दरमहा ६५० ते ७०० डायलिसिस सायकल पूर्ण केल्या जातात. जून २०२५ ते जून २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील १,०२४ नियमित रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला असून एकूण ९,०७६ डायलिसिस सायकल यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. ही सेवा जिल्ह्यातील किडनी विकारग्रस्त रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!