रिव्हर्स घेताना अंदाज चुकल्याने डंपर ३५ फूट दरीत कोसळला; चालकाचा मृत्यू

खेड : तालुक्यातील सुकवली येथे रिव्हर्स घेत असताना चालकाचा अंदाज चुकल्याने डंपर सुमारे ३० ते ३५ फूट खोल दरीत कोसळला. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना खडी क्रशर परिसरात काल (१० जून) सकाळी सुमारे ११.४० च्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, १० जून रोजी सकाळी सुमारे ११.४० वाजण्याच्या सुमारास चालक नितीन विजय पवार (वय २७, रा. चिंचघर-दस्तुरी) हे आपल्या ताब्यातील डंपर (क्र. एमएच ०८ डब्ल्यू ८४७१) घेऊन सुकवली येथील खडी क्रशर परिसरात काम करत होते. यावेळी चालकाचे रिव्हर्स घेत असताना मागील बाजूच्या अंतराचा अंदाज चुकला. त्यामुळे डंपरवरील नियंत्रण सुटून वाहन रस्त्यालगतच्या सुमारे ३० ते ३५ फूट खोल दरीत कोसळले. अपघाताची तीव्रता इतकी होती की चालक गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच भरणे नाका पुलाखाली तैनात असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान, नाणीजधाम यांची २४ तास विनामूल्य अपघात मदत रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी स्थानिकांच्या मदतीने जखमी चालकाला वाहनातून बाहेर काढून तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे दाखल केले. मात्र, रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर नितीन पवार यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी अपघातामुळे सुकवली परिसरात हळहळ व्यक्त होत असून नितीन पवार यांच्या निधनाने चिंचघर-दस्तुरी गावावर शोककळा पसरली आहे. घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.



