मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

श्री क्षेत्र टेरव येथे भवानी मातेच्या गोंधळाचे १७ जूनला आयोजन

चिपळूण : तालुक्यातील श्री क्षेत्र टेरव येथे कुलस्वामिनी श्री भवानी मातेचा गोंधळ सोहळा रूढी परंपरेनुसार १७ जून रोजी सकाळी ११.३० वाजता मृग नक्षत्रात जल्लोषात संपन्न होणार आहे.

भवानी माता ही महाराष्ट्राचे व कदम कुळांचे कुलदैवत असून ही देवता सुख, समृद्धी, सौभाग्य व स्वास्थ देणारी असून दुःखाचा नाश करणारी तसेच इच्छापूर्ती करणारी देवता आहे. श्री क्षेत्र तुळजापूर येथे भवानी मातेच्या पूजेचा मान कदम कुळाचा असून त्यांना भोपे असे संबोधले जाते. जसे वैष्णवाच्यांत भजन – कीर्तन, हरिनाम सप्ताह साजरे होतात, तसेच देवीचा, खंडोबाचा, ज्योतिबाचा गोंधळ, जागर करण्याचा अनेक कुळांचा कुलाचार आहे. ९६ कुळांपैकी ७२ कुळांची कुलस्वामिनी श्री भवानी माता आहे. गोंधळ हा भवानी मातेचा मुख्य व महत्वाचा धार्मिक विधी आहे.

देवस्थानच्या पुजाऱ्यानी पूजेची मांडणी व घट स्थापित केल्यावर मानकऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात येईल. त्या नंतर दिवट्या पाजळून घटाच्या भोवती पाच प्रदक्षिणा घालून ‘भैरी – भवानीचा गोंधळ मांडीला, गोंधळाला यावे, उदो -उदो -उदो’ असा उद्घोष करण्यात येईल. परंपरेनुसार हा गोंधळ, गोंधळी न घालता श्री क्षेत्र टेरव गावातील कदम घालतील.

कुलस्वामिनी श्री भवानी मातेस गाऱ्हाणे घालून मंदिराच्या पूर्वेस आवाराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून देवीचे देणे-मागणे देण्यात येईल. विधिवत पूजा-अर्चा संपन्न झाल्यावर महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल. दुसऱ्या दिवशी मंदिर स्वच्छ करून उद्यापनासह देवीला अभिषेक करण्यात येईल व अशा प्रकारे गोंधळ ह्या धार्मिक विधीची सांगता होईल.

गोंधळ या भवानी मातेच्या मुख्य उत्सवात सर्वांनी अगत्याने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन टेरव ग्रामस्थांच्नी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!