खेडमध्ये भाजपतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

खेड : भारतीय जनता पार्टी (भाजपा) खेड आणि आयुष होमिओपॅथी क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने खेड शहरातील प्रबोधनकार ठाकरे उद्यानात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला चिपळूणची आंतरराष्ट्रीय योगपटू तथा वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सुवर्णपदक पटकावणारी तन्वी रेडीज प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होती. तिच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण लाभले. यावेळी तन्वीने योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांना योगाचे महत्त्व पटवून दिले.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना तन्वी रेडीज हिने सर्वांना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि प्रत्येकाने दररोज किमान १२ मिनिटे तरी योगाचा सराव करावा, असे आवाहन केले. आपल्या यशाचा प्रवास उलगडताना ती म्हणाली की, दुसरीत असताना ती आपल्या बहिणीसोबत कथ्थक शिकण्यासाठी जात होती. मात्र कथ्थकमध्ये विशेष रुची नसल्याने आणि क्रीडा क्षेत्रात काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असल्याने तिने योगाची निवड केली. याबाबत तिने आपल्या आई-वडिलांशी चर्चा केली आणि त्यांनी दिलेल्या प्रोत्साहन व पाठबळामुळेच आज जागतिक स्तरावर भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले. घरात योग क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवता आले, असे तिने सांगितले. आजच्या तरुणांनी कोणतेही क्षेत्र निवडले तरी त्यामध्ये कठोर परिश्रम, त्याग आणि समर्पणाची तयारी ठेवली पाहिजे, असा प्रेरणादायी संदेशही तिने दिला.
यावेळी आयुष होमिओपॅथी क्लिनिकच्या डॉ. वैष्णवी विक्रांत पाटील यांनी योगाचे आरोग्यदायी फायदे विषद केले. शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योग अत्यंत प्रभावी माध्यम असल्याचे सांगताना त्या म्हणाल्या की, आपली अंतर्गत शारीरिक आणि मानसिक स्थिती निरोगी असेल तरच बाह्य आरोग्य चांगले राहू शकते. स्वतःला ओळखून शरीराची काळजी घेण्यासाठी योगाची सवय आवश्यक आहे. प्रत्येक आजारासाठी औषधे किंवा शस्त्रक्रिया हाच पर्याय नसतो. निसर्गाने आपल्याला निरोगी राहण्यासाठी अनेक साधने दिली असून योग हे त्यातील सर्वात प्रभावी साधन आहे. प्रत्येकाने दिवसातील किमान एक तास स्वतःसाठी राखून ठेवत योगाचा सराव करावा. आज केलेली ही गुंतवणूक भविष्यात रुग्णालयांमध्ये खर्च होणारा पैसा वाचवू शकते, असे त्या म्हणाल्या. महिलांच्या आरोग्यासाठी योगाचे विशेष महत्त्व असून योग वर्गांच्या माध्यमातून शंभरहून अधिक महिलांच्या विविध शारीरिक समस्यांवर मात करण्यास मदत झाल्याचा दावा त्यांनी केला.
कार्यक्रमात भाजपा नेते तथा खेडचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनीही उपस्थितांना संबोधित केले. योग ही भारताची सुमारे चार हजार वर्षांपूर्वीची समृद्ध परंपरा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळाल्याचे त्यांनी सांगितले. जगातील १७७ देशांनी योग दिनाच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला असून आज योग हा भारताच्या सांस्कृतिक वारशाचा जागतिक स्तरावर गौरव करणारा विषय बनला आहे. वर्षातील सर्वात मोठा दिवस असलेल्या २१ जून रोजी सूर्य उत्तरायण अवस्थेत असल्याने या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो, अशी माहितीही त्यांनी दिली.
जागतिक योग दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात नागरिक, महिला, युवक, योगप्रेमी आणि भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. योगाचे महत्त्व, आरोग्यदायी जीवनशैली आणि तरुणांसाठी प्रेरणादायी यशाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.



