साळवी स्टॉप येथील ट्रक टर्मिनसचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण

रत्नागिरी : शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि सुटसुटीत करण्याच्या दृष्टीने साळवी स्टॉप येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या ‘ट्रक टर्मिनस’चे लोकार्पण २० जून पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते झाले.
पालकमंत्र्यांनी कोनशिलेचे अनावरण आणि फित कापून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन केले. (युडीसीपीआर-२०२०) मधील ‘समावेशक आरक्षण’ या विशेष तरतुदीनुसार साळवी स्टॉप येथील आरक्षण क्रमांक ११७ वर हे ट्रक टर्मिनस उभारण्यात आले आहे. या नव्या सुविधेमुळे शहरातील अवजड वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.
या सोहळ्याचे औचित्य साधून पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते ‘औदुंबर टुर्स अँड ट्रॅव्हल्स’ आणि ‘जगदंबा टुर्स अँड ट्रॅव्हल्स’ यांना टर्मिनस वापराचे अधिकृत पासेस वितरित करण्यात आले. या सुविधेमुळे स्थानिक ट्रॅव्हल्स व्यावसायिक आणि चालक-मालक यांना हक्काची व सुरक्षित जागा उपलब्ध झाली आहे.
या सोहळ्याला नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, नगरसेवक सौरभ मलुष्टे, बंड्या साळवी यांच्यासह नगरपालिकेचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साळवी स्टॉप परिसरातील या नव्या प्रकल्पामुळे परिसराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.



