जिल्ह्याला पुढील तीन दिवस यलो अलर्ट

रत्नागिरी : मान्सून सक्रिय झाल्याने संपूर्ण कोकण किनारपट्टीसह रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानातील या बदलांमुळे जिल्हा प्रशासनाने किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार, रत्नागिरी आणि संपूर्ण कोकण विभागात पावसाचा मुक्काम कायम राहणार आहे. २५ ते २७ जून या पुढील तीन दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या काळात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर २८ जून रोजी कोणताही मुख्य अलर्ट नसला तरी काही भागांत पावसाची हजेरी कायम राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ व २६ जून रोजी यलो अलर्ट, तर २७ जून रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.



