मुख्य बातमी

विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षक आणि पालकांचे योगदान महत्त्वाचे : डॉ. ऋचा औरंगाबादकर

फाटक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव

रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी ध्येयावर लक्ष केंद्रित करून आनंदाने अभ्यास करावा. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक जण कोणत्यातरी क्षेत्रात हुशार असतो, ते क्षेत्र प्रत्येकाने ओळखावे, असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्या, व फाटक हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी डॉ. ऋचा औरंगाबादकर- टेंबे यांनी केले. औचित्य होते फाटक हायस्कूल व श्रीमान वि. स. गांगण कला, वाणिज्य आणि कै. त्रि. प. केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे.

बुधवारी सकाळी शाळेच्या सांस्कृतिक सभागृहात कार्यक्रम झाला. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा व संस्थेच्या उपाध्यक्षा ॲड. सौ. सुमिता भावे, दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष ॲड. विनय आंबुलकर, कार्याध्यक्षा सौ. दाक्षायणी बोपर्डीकर, मुख्याध्यापक राजन कीर, पर्यवेक्षिका सौ. नेहा शेट्ये आणि प्रथम आलेले गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.

प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक राजन कीर यांनी शाळेच्या कला, क्रीडा आणि शैक्षणिक विभागातील यशाचा आलेख मांडला. यानंतर शाळेला डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेतील गोल्ड मेडल प्राप्त करणाऱ्या तसेच एसएससी बॅच २०१२ च्या १०० टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त माजी विद्यार्थिनी डॉ. ऋचा औरंगाबादकर यांचा सत्कार ॲड. सौ. सुमिता भावे यांनी केला.

दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या नवेली सचिन भिंगार्डे आणि प्रणिता प्रणव परांजपे, बारावीतील कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील तन्वी अमित कांबळे, प्रज्ज्वल राजेश काजरेकर, गार्गी विकास पावसकर या प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांसह द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांसह आणि विविध विषयातील प्रथम क्रमांक तसेच ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त ३६ गुणवंतांना रोख रक्कम व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.

सत्कार समारंभासाठी विविध देणगीदारांनी संस्थेकडे ठेवलेल्या देणगीचे व्याज, विद्यार्थी कल्याण निधी, दहावीची बॅच, माजी कर्मचारी यांच्याकडून प्राप्त देणगी व व्याजातून ५२ विद्यार्थ्यांना ४२ हजार ८५० ची रोख रक्कम आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. मंजिरी आगाशे, श्रेया रामभरे, दिनेश नाचणकर, अजित चवेकर, राजाराम पानगले या शिक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना नवेली भिंगार्डे, पर्णिका परांजपे, गार्गी पावसकर यांनी आपल्या यशामध्ये शिक्षकांचे आणि पालकांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगितले. पालक सारंगी भिंगार्डे, अपर्णा तगारे, विकास पावसकर यांनी शाळा आणि शिक्षकांचे विशेष आभार मानले.

कार्याध्यक्ष दाक्षायणी बोपर्डीकर विद्यार्थ्यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचा आदर्श घ्यावा, असे सांगितले तर अध्यक्षीय मनोगतातून ॲड. सौ. सुमिता भावे यांनी माजी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवून विद्यार्थ्यांसमोर यशाचा आयडॉल उभा करण्याचा हा शाळेचा प्रयत्न असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली दळी, मंजिरी आगाशे, आरती पाथरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय शिल्परेखा जोशी यांनी तर आभार दिनेश नाचणकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!