भारतीय तटरक्षक दल रत्नागिरीतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

रत्नागिरी : बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून भारतीय तटरक्षक दल रत्नागिरीच्या वतीने आज सकाळी योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तटरक्षक दलाच्या जवानांसह विविध शाळा आणि सरकारी विभागांमधून आमंत्रित केलेल्या प्रतिनिधींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
भारतीय तटरक्षक हवाई केंद्र रत्नागिरीच्या धावपट्टी डीस्पर्सलवर २१ जून रोजी पहाटे योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या योग सत्राची सुरुवात झाली. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमात विविध आसने, श्वसनाचे व्यायाम, प्राणायाम आणि ध्यानधारणा या क्रियांचा समावेश करण्यात आला होता. याशिवाय, योगावर आधारित व्याख्यान आणि स्वच्छता मोहीम देखील राबवण्यात आली.
तटरक्षक वायू अवस्थानचे कमांडिंग ऑफिसर उपमहानिरीक्षक कुणाल नाईक यांनी या सत्राचे उद्घाटन केले. संतुलित आणि निरोगी जीवनशैलीला चालना देण्यासाठी योगाच्या महत्त्वावर त्यांनी विशेष भर दिला. ते म्हणाले, “योग हे आपली शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक स्पष्टता वाढवण्याचे एक प्रभावी माध्यम आहे, जे आपल्या आव्हानात्मक कर्तव्यांसाठी अत्यंत आवश्यक गुण आहेत.”
या सोहळ्याची सांगता ध्यानधारणेने झाली, ज्यामुळे सर्व सहभागींना ताजेतवाने आणि उत्साही वाटले. सहभागींनी आपले सकारात्मक अनुभव शेअर करत योगाच्या फायद्यांचा पुनरुच्चार केला.
१२ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या ६९/१३१ या ठरावाद्वारे मान्यता मिळाल्यापासून भारतीय तटरक्षक दल रत्नागिरी नियमितपणे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहे. हा सोहळा केवळ आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत नाही, तर आपल्या जवानांच्या आणि संपूर्ण समाजाच्या आरोग्य व कल्याणासाठी भारतीय तटरक्षक दलाची असलेली कटिबद्धता देखील दर्शवतो.



