मुख्य बातमी

पटवर्धन हायस्कूलमध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात

विद्यार्थ्यांना मिळाले योगासनांचे शास्त्रोक्त धडे

रत्नागिरी : ‘निरोगी शरीर आणि प्रसन्न मन’ हाच सुखी जीवनाचा खरा पाया आहे, हा मोलाचा संदेश देत पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित विशेष शिबिरात शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत योगासनांचे प्रात्यक्षिक केले आणि तज्ज्ञांकडून मौल्यवान मार्गदर्शन मिळवले.

शाळेच्या ठाकूर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका श्रीमती घाटविलकर आणि क्रीडा शिक्षक श्री. साळुंखे प्रामुख्याने उपस्थित होते.

या प्रसंगी योगशिक्षिका योगतज्ज्ञ श्रीमती वझे मॅडम यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना विविध आसने, प्राणायाम आणि ध्यान यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी स्वतः प्रत्येक आसनाचे सुंदर प्रात्यक्षिक सादर करत विद्यार्थ्यांकडून ती शास्त्रोक्त पद्धतीने करून घेतली. चुकीच्या पद्धतीने योगासने केल्यास होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन किती गरजेचे आहे, यावर त्यांनी विशेष भर दिला.

कार्यक्रमाची सुरुवात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने झाली. शाळेच्या पर्यवेक्षिका श्रीमती शिरोळकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी योग कसा फायदेशीर आहे, यावर प्रकाश टाकला. श्रीमती वझे यांनी विद्यार्थ्यांना सुदृढ आरोग्यासाठी रोज योगासने करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी श्री. पालकर यांनी सर्व उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. क्रीडा शिक्षक श्री. साळुंके यांच्या चोख नियोजनामुळे आणि सर्व शिक्षक वृंदाच्या सहकार्यामुळे पटवर्धन हायस्कूलचा हा योग दिन सोहळा अत्यंत यशस्वी ठरला. या उपक्रमाबद्दल रत्नागिरीतील शैक्षणिक वर्तुळातून शाळेचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!