टीईटी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या संशयामुळे उद्याची परीक्षा पुढे ढकलली

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत उद्या (२८ जून) राज्यभर होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटल्याच्या संशयामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शनिवारी जाहीर केला.
परिषदेच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, नीट-२०२६ परीक्षेतील गैरप्रकार लक्षात घेऊन टीईटी परीक्षेसाठी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र, शनिवारी पहाटे गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे पोलिसांनी छापा टाकला असता काही व्यक्तींकडे टीईटी जून २०२६ परीक्षेतील प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांशी साधर्म्य असलेली माहिती आढळून आली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता काही प्रश्न जुळत असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर परीक्षा पूर्णपणे पारदर्शक वातावरणात व्हावी आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याने २८ जूनची टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे.
परीक्षेची नवीन तारीख आणि पुढील सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याचेही परिषदेने म्हटले आहे.


