जिल्ह्यातील कुपोषित बालकांचे जिल्हा परिषद सदस्य स्वीकारणार पालकत्व
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी घेतला आढावा : कुपोषित बालकांसाठी विशेष यंत्रणा उभी करणार

रत्नागिरी : जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. यासंदर्भात काल (२८ जून) जिल्हा परिषदेत बैठक पार पडली असून, कुपोषित बालकांचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी घेतला आहे. कुपोषित बालकांची संख्या पुढील एका वर्षात ५० टक्क्यांनी कमी करण्याचा प्रशासनाचा निर्धार आहे. पुढील ६ ते ७ महिन्यांत याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
जिल्ह्यात सध्या ‘सिव्हिअर’ श्रेणीतील ३८ बालके कुपोषित आहेत. या सर्व बालकांचे पालकत्व आता संबंधित प्रभागातील जिल्हा परिषद सदस्य स्वीकारणार आहेत असे डॉ. सामंत यांनी यावेळी सांगितले.
कुपोषित बालकांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विशेष आरोग्य यंत्रणा उभी केली जाणार आहे. या बालकांना आणि त्यांच्या पालकांना तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आठ दिवसांच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. ‘डेरवण’ येथील रुग्णालयाच्या मदतीने या बालकांना प्रथिनायुक्त आहार आणि लाडू दिले जाणार आहेत. तसेच, जिल्हा नियोजन समितीकडून औषधे आणि पोषण आहारासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
जिल्ह्यातील १० ‘पीएचसी’ सेंटर्स ‘स्मार्ट’ आणि ‘मॉड्युलर’ करण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यासाठी तातडीने कार्यवाही सुरू केली जाणार आहे. शालेय शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या २०० ते २५० नवीन खोल्या बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात १५ ते २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या या संयुक्त प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील कुपोषणाची समस्या कमी होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास डॉ. सामंत यांनी व्यक्त केला आहे.



